esakal | वाहनाच्या ९०९९ क्रमांकाचा रुबाब राजूबाबा यांच्या मोबाईलमध्येही
sakal

बोलून बातमी शोधा

rajubaba aavale vehicle story by sandeep khandekar

जयवंतराव आवळे यांचे वडगाव मतदारसंघात गावागावांतल्या मतदारांशी घरोब्याचे संबंध. ॲम्बेसडरमधून त्यांचा दौरा कायम असायचा.

वाहनाच्या ९०९९ क्रमांकाचा रुबाब राजूबाबा यांच्या मोबाईलमध्येही

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर :जयवंतराव आवळे पाच वेळा आमदार झाले. इचलकरंजीतून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. जेल भरो आंदोलनाला ते सामोरे गेले. ते १९८० पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून कार्यरत राहिले. सामाजिक न्यायमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. राजकीय प्रवासात त्यांच्या घरी चारचाकी असणे अनिवार्य होते. ॲम्बेसडर त्या काळचे प्रतिष्ठेचे वाहन. आवळे यांनी गाडीसाठी ९०९९ क्रमांकावर बोट ठेवले. हाच नंबर घरातील नव्या गाड्यांसाठी फायनल झाला. मुलगा राजूबाबा आवळे गतवर्षी विधानसभेच्या रिंगणात होते. मतदारांत गाडीचा नंबर फेमस होताच; त्याच नंबरने विधानसभेत चमत्कार घडवला.


जयवंतराव आवळे यांचे वडगाव मतदारसंघात गावागावांतल्या मतदारांशी घरोब्याचे संबंध. ॲम्बेसडरमधून त्यांचा दौरा कायम असायचा. गाडीच्या नंबरची वेगळी ओळख मतदारांत होती. आवळे व ९०९९ हे समीकरण दृढ झाल्याचा तो परिणाम होता. ज्या गावात ॲम्बेसडरची चाके थांबणार, त्या गावात आवळे आले, हे सांगायची गरज राहायची नाही. हा नंबर घेण्यामागे विशेष असे कारण नव्हते. अंकाच्या बेरजेचे शास्त्रही त्या मागे नाही. 
राजकारणात मात्र त्याचा फायदा झाला. वडगाव विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार झाले. अर्थात २००४ पर्यंत त्यांच्या आमदारकीचा प्रवास होता.  त्यांनी २००९ च्या निवडणुकीत मतदारसंघ बदलला. लातूरच्या लोकसभा मतदारसंघातून ते निवडणुकीला सामोरे गेले. मतदारांनी तेथे त्यांना कौल दिला. पाच वर्षांच्या कारकीर्दीत गाडीचा नंबर तेथेही प्रसिद्ध झाला. 

मुलगा राजूबाबा त्यांचे राजकीय जीवन पाहत मोठे झाले. पुण्याच्या बिशप इंग्लिश मीडियम स्कूलचे ते विद्यार्थी. पुढे इचलकरंजीतल्या मॉडर्न हायस्कूलमध्ये त्यांचा प्रवेश झाला. कोल्हापुरातल्या शहाजी छत्रपती महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. विद्यार्थीदशेत त्यांचाही गाडीतून प्रवास ठरलेला होता. मित्रपरिवारातही या नंबरची क्रेझ होती. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावले. हातकणंगले मतदारसंघातून त्यांच्या विजयाचा वारू दौडला.

हेही वाचा- कुस्ती सुटली तरी गड्याची तांबड्या मातीशी नाळ कायम ; सोशल मीडियाद्वारे करतोय कुस्तीचा प्रचार -

घरातल्या चार गाड्या प्रचारात महत्त्वपूर्ण ठरल्या. गावागावांतल्या मतदारांच्या गाठीभेटीचा कार्यक्रम गाड्यांमधून झाला. राजूबाबा एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सामाजिक कामांसाठी त्यांचा प्रवास याच गाड्यांतून होता. महात्मा फुले सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दहा वर्षे काम पाहिले. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य आहेत. केडीसीसी बॅंकेचे संचालक, तर जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गाडीच्या नंबरचा लौकिक पाहता त्यांनी मोबाईलचे शेवटचे चार क्रमांक ९०९९ ठेवले आहेत.

संपादन- अर्चना बनगे