डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त होतील, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

कोल्हापूर - “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचे भारतात स्वागत आहे”, अशी मिश्किल टिप्पणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांग उन्नती योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप आज सामाजिक न्याय मंत्री आठवले आणि केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते करण्यात आलं. हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठात पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाहा - शब्बास मर्दा.... तो थेट दवाखान्यातून अ‍ॅम्बुलन्समध्ये बसून गेला परीक्षा केंद्रावर.... 

“डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त होतील”, असा दावा रामदास आठवले यांनी यावेळी केला.डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत.

हे सरकार फार काळ टिकणार नाही

दरम्यान, राज्यातील सध्याच्या घडामोडींवर रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. याशिवाय भाजपचे नेते नारायण राणे यांनी आठ दिवसात महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा केला आहे. राणे असं काही म्हणत आहेत म्हणजे तशा काही हालचाली असतील”, असं ही रामदास आठवले म्हणाले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale comment on Donald Trump India tour