
जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड लसीकरण केंद्राला मान्यता मिळाली. सोमवारपासून (ता. 25) लसीकरणाला प्रारंभ होणार आहे.
जयसिंगपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड लसीकरण केंद्राला मान्यता मिळाली. सोमवारपासून (ता. 25) लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. शिरोळ ग्रामीण रुग्णालयानंतर तालुक्यातील हे दुसरे केंद्र असणार आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या डॉक्टर आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लस सुरक्षित असून यामुळे प्रतिकार शक्ती वाढून कोवीडशी लढण्याचे बळ मिळणार असल्याची माहिती, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर यांनी दिली.
डॉ. खटावकर म्हणाले, ""शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्राला मान्यता दिली होती. मात्र, तालुक्याचे प्रमुख शहर आणि परिसरातील गावांचा विस्तार लक्षात घेता सोयीचे केंद्र म्हणून जिल्हा प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरणाला मान्यता दिल्याने आता तालुक्यात दोन ठिकाणी लस दिली जाणार आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयात खास करून हे केंद्र दिले जाते. मात्र, आता जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला विशेष बाब म्हणून जिल्हा प्रशासनाने ही मान्यता दिली आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजता नगराध्यक्षा डॉ. निता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतिक पटेल, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल घोडके यांना लसीकरणाने मोहिमेचा प्रारंभ केला जाणार आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविकांनाही लसीकरण केले जाणार आहे.
तसेच आरोग्य केंद्राला नव्याने मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या डॉक्टरांसह हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर केलेल्या नियोजनानुसार याठिकाणी लसीकरण केले जाणार आहे.''
संपादन - सचिन चराटी
kolhapur