Republic Day 2021 : कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देवू :  सतेज पाटील

लुमाकांत नलवडे
Tuesday, 26 January 2021

 प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा ः कोविड पार्श्‍वभूमीची समारंभाला किनार 

कोल्हापूर :  कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोविड अजून संपलेले नाही. प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही ती घेणे गरजेचे आहे. "नो मास्क, नो एन्ट्री' हा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात सुरू केला, पुढे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर राबविला. "जगात भारी आम्ही कोल्हापुरी' हे दाखवून दिल्याचे सांगून पालकमंत्री सतेज पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या. कोविड काळात कार्यरत असलेल्या सर्वाचे आभारही पालकमंत्र्यांनी मानले. 

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शाहू मैदानावर सकाळी सव्वानऊ वाजता ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी त्यांनी भाषण केले. ध्वजारोहन, ध्वजवंदना आणि राष्ट्रगीत अशा सोहळ्यात शहिद जवानांचे कुटुंबिय, पोलिस अधिकारी, पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह मोजकेच नागरिक उपस्थित होते.

कोविड-19च्या पार्श्‍वभूमीमुळे आजच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण्याचा कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी नव्हते. कवायतींची मालिका येथे नव्हती. मात्र पोलिस बॅण्ड आणि त्यांच्या कवायतीने पालकमंत्र्यांना ध्वजारोहनानंतर सलामी देण्यात आली. 
शामियान्यात पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा- हातकणंगलेत जनसुराज्यला तीन वर्षात दुसऱ्यांदा संधी

शहीद ऋषीकेश रामचंद्र जोधंळे यांचे वारस वीर माता कविता रामचंद्र जोधळे आणि शहीद संग्राम शिवाजी पाटील यांच्या वारस वीरपत्नी हेमलता पाटील यांना ताम्रपट देवून विशेष गौरव करण्यात आला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनाही वेगवेगळ्या पुरस्काराबद्दल पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते विशेष गौरविण्यात आले. आरोग्यकाळात काम केलेले जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.योगेश साळे यांच्यासह आरोग्य विभागातील पाच अधिकारी, अग्नीमन दलातील जवान, महसूल मधील अधिकारी, क्रीडा विभागातील पुरस्कार प्राप्त खेळाडू वैयक्तिक पुरस्कार प्राप्त मान्यवरांनाही पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले. 
 
दरम्यान जिल्ह्यातील शासकीय कार्यलये, विविध सेवा संस्था, तालीम संघटना, राजकीय पक्ष कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथेही ध्वजारोहनाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. मात्र यावेळी कोविड मुळे शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांविनाच ध्वजारोहन झाले. केवळ शिक्षकांनी ध्वजरोहन करून राष्ट्रगीत गायिले. 

शहर आणि परिसरात आज ठिकठिकाणी जिलेबीचे स्टॉल दिसून येते होते. तर जिलेबी बरोबरच तिखट चिवडा, गुलाब जामुन, मिठाई, सामोसा, कचोरी, ढोकळा यांनाही मोठी मागणी दिसून आली. शहर परिसरात ठिकाठिकाणी साऊंड सिस्टीमवर देशभक्तीपर गितांची धून असल्यामुळे अख्य्या शहरात देशभक्तीपर वातावरण होते. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: republic day celebration kolhapur marathi news latest news