मतदारांचा दिवस होणार गोड ;  प्रजासत्ताक दिनी ‘कॅश’करण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021


इच्छुकांकडून जिलेबी वाटपाचे नियोजन

कोल्हापूर : एरव्ही प्रजासत्ताक दिन म्हणजे शासकीय ध्वजवंदन, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, गल्लोगल्ली उभारलेले जिलेबीचे स्टॉल, त्यावर दिवसभर लावलेली  देशभक्तिपर गीते असा सगळा माहोल; पण यावेळी महापालिका निवडणुकीची किनार या उत्सवाला असून, त्यातून काही प्रभागात मतदारांना जिलेबी वाटपाचे नियोजन इच्छुकांनी केले आहे. त्यासाठी कोल्हापूरसह जिलेबीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडल (जि. सांगली) येथूनही ५०० ते १००० किलो जिलेबीची मागणी केली आहे.

दरवेळी महापालिकेची निवडणूक दिवाळीच्या तोंडावर येते. त्यावेळी प्रत्येक प्रभागात उमेदवारांकडून दिवाळी साहित्याची भेट ठरलेली असते. अपवाद वगळता सर्वच उमेदवारांकडून मते खेचण्यासाठी ही क्‍लुप्ती लढवली जाते. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आहे. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूकच पुढे ढकलली. त्यामुळे खर्च कमी झाल्याच्या आनंदात आहेत; पण आता विरोधकांनी जिलेबी वाटपाचे नियोजन केल्याने आपणही कुठे कमी पडू नये या भावनेतून एकाच प्रभागात अनेकांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यातून मतदारांचा दिवस मात्र गोड होणार आहे. 

हेही वाचा- हातकणंगलेत जनसुराज्यला तीन वर्षात दुसऱ्यांदा संधी

महापालिकेची आरक्षण सोडत झाल्यानंतर इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याची सलामी दिली आहे. त्यानंतर नववर्षाच्या स्वागताचे आणि अलिकडेच झालेल्या मकर संक्रांतीचे शुभेच्छांचे फलक आणि सोशल मीडियावर आभाळभर त्याच्या शुभेच्छा देण्यात आला. महापालिकेची निवडणूक एप्रिल-मेमध्ये होईल. या काळात दुसरा कोणाताही मोठा सार्वजनिक सण नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनही ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न इच्छुकांनी सुरू केला आहे. उद्या जिलेबी वाटपाच्या निमित्ताने थेट मतदारांशी संपर्क करण्याचे नियोजन आहे. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: republic day jilebi story sangli kolhapur marathi news