शेतकरी झाला हताश : दसऱ्याला सजावटीसाठी "कोणी झेंडू घेता का झेंडू'

युवराज पाटील
Thursday, 22 October 2020

 घाऊक दरही घसरले 

कोल्हापूर :  "कोणी झेंडू घेता का झेंडू' अशी अवस्था फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची परतीच्या पावसामुळे झाली आहे. किरकोळ बाजारात फूलांचे दर पावशेरला वीस रूपयापर्यंत खाली घसरले आहे. घाऊक मार्केटमध्ये प्रति किलो दर 40 ते 50 रूपये किलो इतका आहे, कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून झेंडूकडे पाहिले जाते.

दरवर्षी दसरा डोळ्यासमोर ठेऊन फुलांची लागवड केली जाते. साधारणतः 50 ते 55 व्या दिवशी फूल लागण्यास सुरवात होते. तीन महिन्यात फुलांची बाग बहरून येते. एकाने फुलावी ाग लावली म्हणून दूसराही लावतो असे चित्र पाच वर्षापूर्वी निर्माण झाले होते. मागणी तितका पुरवठा हे बाजारपेठेचे गणित बिघडले की कवडीमोल भावाला वस्तू विकावी लागते याचा अनुभव फूल उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला. रस्त्यावर फुले टाकून गावाकडे परतण्याची वेळ त्यावेळी आली. महापालिकेच्या पथकाने दूसऱ्या दिवशी फुले गोळा केली. 

दसऱ्याच्या पहिल्या माळेला झेंडूच्या फुलांचा भाव प्रतिकिलो 100 रूपये इतका होता. तिसऱ्या माळेपर्यंत भाव स्थिर राहिल्याने किमान उत्पादन खर्च तरी बाहेर पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या चार दिवसापासून सायंकाळी पाऊस ज्या पद्धतीने हजेरी लावत आहे ते पाहता झेंडूच्या मार्केटचे गणित कोलमडू लागले आहे. फुलांची रस्त्यावर विक्री करतात त्यांचा दर पावशेरला वीस ते तीस रूपये इतका आहे. सायंकाळपर्यंत फुलांची विक्री न झाल्यास करायचे काय? असा प्रश्‍न पडतो. फूल पाणी साचून राहिल्यास ते खराब होण्यास मदत होते. 

हेही वाचा- दख्खनचा राजा श्री जोतिबा  देवाचा उद्या होणार जागर ; पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा -

दसऱ्याला सजावटीसाठी तसेच खंडेनवमीच्या पूजेला फुलांचा वापर होतो. जिल्ह्यात राशिवडे, महे तसेच गणेशवाडी येथे प्रामूख्याने फुलांचे पीक घेतले जाते. पावसाने मात्र फुल मार्केटचे गणित बिघडून गेले आहे. कोरोना पर्यायाने लॉकडाऊन यामुळे मंदिरे बंद आहेत. फूल व्यापाऱ्यांचे अर्थकारण मंदिरात येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. गेल्या सहा महिन्यात आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अन्य फुलांना, पुष्पहारांना मार्केट नाही. अशा स्थितीत घाऊक फूल विक्रेते तसेच शेतकऱ्यांना झेंडू विक्रीपासून चार पैसे मिळतील अशी आशा होती ती ही परतीच्या पावसामुळे मावळली आहे. 

लॉकडाऊन त्यामुळे बंद असलेली मंदिरे यामुळे फूल विक्रेत्यांचे अर्थकारण बिघडले आहे. परतीच्या पावसाने झेंडूच्या दराला फटका बसला आहे. पहिल्या दिवशी घाऊक मार्केटला शंभर ते दीडशे रूपये किलो इतका भाव होतो तो आता 50 ते 60 रूपयापर्यंत खाली आला आहे. पावसाने उघडीप दिली तर हाताशी आलेल्या फूलांना थोडाफार दर मिळेल अन्यथा काही खरे नाही. 
विक्रम जरग, जेष्ठ फूल व्यावसायिक 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: return rain hit the zendu flowers 80 rs per kg