esakal | ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर आलीय ही वेळ; ७२ अभियंत्यांवर १५०० योजनांचा भार
sakal

बोलून बातमी शोधा

Rural water supply of Zilla Parishad shahu kolhapur update news

ग्रामीण जनतेला स्वच्छ व पुरेसे पाणी देण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर आलीय ही वेळ; ७२ अभियंत्यांवर १५०० योजनांचा भार

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर १०२७ गावांतील व वाडीवस्तीवरील दीड हजार पाणी योजनांची जबाबदारी आहे. तसेच, पंचगंगा पाणी प्रदूषणापासून जलजीवन मिशनपर्यंत आणि टंचाईपासून शौचालयापर्यंत डझनभर कामांचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. ही कामे करण्यासाठी फक्त ७२ अभियंते कार्यरत आहेत. यातीलही निम्म्याहून अधिक अभियंते मिस्त्रीमधून पदोन्नतीने शाखा अभियंता झाले आहेत. त्यामुळे या विभागात कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. पाणी योजनांसारख्या गंभीर विषयाला आवश्‍यक व कुशल मनुष्यबळ मिळणे आवश्‍यक आहे.

ग्रामीण जनतेला स्वच्छ व पुरेसे पाणी देण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर आहे. गावोगावचे सर्वेक्षण करणे, पाणी योजनांचा आराखडा तयार करणे, गावाला परवडतील अशा योजना तयार करणे, त्याचे सादरीकरण करणे, निविदा प्रक्रिया राबविणे, योजनांचे कामकाज सुरू झाले की देखरेख करणे आदी जबाबदारी या विभागावर आहे. मात्र, अलीकडच्या काळात या विभागाची एवढीच मर्यादित जबाबदारी राहिलेली नाही. तर जलजीवन मिशन योजनेचे काम करणे, १५ व्या वित्त आयोगातून तिन्ही स्तरावर आलेल्या निधीच्या खर्चाचे नियोजन करणे, आमदार, खासदार निधीतून पाण्याच्या योजना करणे, टंचाई आराखडा व त्याची अंमलबजावणी, सांडपाणी आणि घनकचरा, शौचालय, नरेगातील सिंचन विहिरी, पंचगंगा प्रदूषण, गाव तलाव आणि पाझर तलाव तसेच निवडणूक, पूर परिस्थिती, अतिवृष्टी आदींची कामेही या विभागावर सोपवली जातात. 

हेही वाचा- ‘मी एव्हरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा फडकावणारच! आत्मविश्‍वासाने कस्तुरी सावेकरने  सर्वोच्च हिमशिखर केले सर

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे असलेले तोकडे मनुष्यबळ व त्या तुलनेत असलेली कामांची प्रचंड संख्या यामुळे हा विभाग कोलमडून पडला आहे. केवळ ७२ अभियंत्यांवर संपूर्ण जिल्ह्याच्या पाणी योजनांसह विविध कामांची जबाबदारी हा विभाग पार पाडत आहे. यातही कुशल मनुष्यबळ तर हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत आहे. कारण मिस्त्री पदावरून शाखा अभियंता झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाणी योजनांवर दरवर्षी ५० ते १०० कोटी रुपये खर्च करत असताना या योजनांवर देखरेख करणारे मनुष्यबळ पुरेसे व तांत्रिक योग्यता असलेले आहे का, याचा शासनस्तरावरून गांभीर्याने विचार होणे आवश्‍यक आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कामकाज वाढले आहे. दरवर्षी नवीन योजना येतात. मात्र, मनुष्यबळात काहीच फरक नाही. त्यातूनही कुशल मनुष्यबळ हा विषय महत्त्वाचा आहे. असंख्य योजना व अभियंत्यांची तोकडी संख्या असल्याने वेळेत कामे पूर्ण करण्यात अडचणी येतात. या विभागास अतिरिक्‍त मनुष्यबळाचा पुरवठा करणे आवश्‍यक आहे. 
- मनीष पवार, प्र. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा

संपादन- अर्चना बनगे