
अवघ्या 23 वर्षीय ऋषीकेश मांगुरे याने हे यश मिळवले आहे. दिड दोन महिन्यात एक कंटेनर माल तो परदेशात पाठवितो.
कोल्हापूर : कांचनवाडी (ता.करवीर. जि.कोल्हापूर) या छोटा गावातून "टूटीफ्रुटी' (चेरी)ची निर्यात होते. तेही दुबई आणि बांगला देशात. अवघ्या 23 वर्षीय ऋषीकेश मांगुरे याने हे यश मिळवले आहे. दिड दोन महिन्यात एक कंटेनर माल तो परदेशात पाठवितो. यासाठीचा पपई हा कच्चा माल स्थानिकांसह तमिळनाडूसह अन्य राज्यातून घेतो.
यशाचे गमक
काय आहे या तरुणाच्या यशाचे गमक ते आम्ही थेट त्यांच्या फॅक्टरीतच जावून पाहिले. तेंव्हा कळाले की चिकाटीला बुद्धीची आणि प्रशिक्षणाची जोड असली तर निर्यात परवाना घेऊन एजंटाशिवाय उत्पादने परदेशात पाठवता येतात.हे दाखवून दिले आहे.
ऋषीकेश मांगुरे याने सिव्हील डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतले. पुढे बी. ई. करायचे होते. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले पण तिकडे गेलाच नाही. घरची शेती असली तरीही त्याने शेतीत वेगळं शोधण्याचा निर्णय घेतला. यातून केळीचे वेफर्स बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. एजंटामार्फत परदेशात देण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पुढे अभ्यास सुरू केला आणि त्यातून अवघ्या दीड-दोन वर्षात चेरी उत्पादनाचा मार्ग सापडला. केक, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम बनविणाऱ्या कंपन्यात त्याला मागणी आहे.
प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम (पीएमईजीपी) या "स्टार्टअप' योजनेतून कर्ज व अनुदान मिळाले. गावातील शेतात स्वतःची फॅक्टरी उभी राहिली. तेथून केक, दुग्धजन्यपदार्थ, आईस्क्रीम बनविणाऱ्या कंपन्यांचा शोध सुरू केला. स्थानिक बाजारपेठे पेक्षा आंतरराष्ट्रीय मार्केटवर लक्ष केंद्रीत केले. त्याच्या प्रयत्नांना यश आले. एवढेच नव्हे तर त्याच्या विनंतीनुसार बांगला देशातील एक उद्योजक थेट कांचनवाडीत दाखल झाला.
हेही वाचा- जनावरांच्या गोठ्यात त्या दोघांना बघून नातेवाईकांनी फोडला हंबरडा; गावावरही पसरली शोककळा
उत्पादनाचा दर्जा पाहिला आणि त्यांनी ऑर्डर दिली. तेथून ऋषीकेशने निर्यातीसाठी आवश्यक परवाना घेतला. अवघ्या सहा महिन्यात त्याची निर्यात सुरू झाली. पुढे बांगला देशाबरोबरच दुबई मधील उद्योजकांना सुद्धा त्याच्याकडील चेरी पोचू लागली. गतवर्षीचा कोरोना काळ वगळता त्याने 45 दिवसांत चेरीचा एक कंटेनर चेरी मुंबईच्या सागरी मार्गे बांगला देश आणि दुबईला पाठविला आहे.
अशी आहे प्रकिया
तमिळनाडूसह कर्नाटक आणि अन्य राज्यात पपईचे पिक भरपूर आहे. तेथून कच्चा पपई थेट कांचनवाडीत येतो. यावर 20 ते 30 दिवसांची प्रक्रिया केल्यानंतर रोज 500 ते 1000 किलो चेरी तयार होऊ शकतो. ज्या देशाला चेरी जाणार आहे. त्यांच्या मागणी प्रमाणे रंग आणि सारखेचे प्रमाण ठेवले जाते.
सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसएलआयसी) यांच्याकडे पुण्यात तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले. तेथे एक्स्पोर्ट करण्याची प्रक्रीया शिकविली होती. त्याचा आधार घेवून मी एक्स्पोर्टचे लायसन्स काढले, बॅंकेत अकाऊंट काढले आणि व्यवसाय सुरू केला. ऍग्रोवन आणि एसएलआयसीचा मोठा वाटा माझ्या यशात आहे. तसेच वडील आनंदा आणि लहान भाऊ ऋतुराज यांचेही सहकार्य मिळत आहे.
ऋषीकेश मांगुरे, उद्योजक- कांचनवाडी
संपादन- अर्चना बनगे