Womens Day खबरदार..! छेडछाड कराल तर...

sakal media group celebration for womens day
sakal media group celebration for womens day

कोल्हापूर - ‘छेडछाड कराल तर खबरदार, आम्ही ताराराणींच्या वारसदार’ असा नारीशक्तीचा बुलंद आवाज आज ऐतिहासिक बिंदू चौकात दुमदुमला. महाविद्यालयीन विद्यार्थिनींबरोबरच विविध महिला संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्या एकवटल्या आणि हातात हात गुंफून त्यांनी स्त्री सन्मानाचा वज्रनिर्धार केला. निमित्त होते, सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या ‘दामिनी व्हा’ मानवी साखळीचे. दरम्यान, स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांबरोबरच शाहिरीतून स्त्रीशक्तीला सलाम झाला.

‘चला, निर्भय होऊया, दामिनी बनूया’ असे आवाहन ‘सकाळ’ने चार दिवसांपूर्वी केले आणि मानवी साखळीत सहभागासाठी विविध संस्था व संघटनांनी उत्स्फूर्त नोंदणी केली. आज सकाळी सातपासूनच त्यांची मांदियाळी बिंदू चौकात अवतरू लागली. हातात विविध घोषवाक्‍यांचे फलक घेऊन महिला व मुलींचे जथ्थे येथे येऊ लागले. साडेआठच्या सुमारास सारा चौक गर्दीने तुडुंब भरून गेला आणि सर्वांच्या साक्षीने व्हाईट आर्मीच्या व्हाईट शॅडो टीमच्या स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांना प्रारंभ झाला. एकीकडे ही प्रात्यक्षिके सुरू असतानाच ‘राजमाता जिजाऊ- ताराराणी की जय’ अशा घोषणांनी सारा माहोल संमोहित झाला होता. याच माहोलात शाहिरा दीप्ती व तृप्ती सावंत यांच्या वीररसातील पोवाड्यांना प्रारंभ झाला. जिजाऊ आणि ताराराणींच्या पोवाड्यांबरोबरच त्यांनी स्त्री सन्मानाचा पोवाडा यावेळी सादर केला. त्यानंतर माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झालेल्या करवीर कन्या कस्तुरी सावेकर हिने सर्वांना स्त्री सन्मानाची शपथ दिली. त्यानंतर एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला चळवळ आणखी नेटाने पुढे नेण्याचा संकल्प यावेळी झाला.

व्हाईट आर्मीची स्वसंरक्षण प्रात्यक्षिके
व्हाईट आर्मीच्या व्हाईट शॅडो टीमच्या वतीने स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्याशिवाय मानवी साखळीचे नेटके संयोजनही या टीमने केले. व्हाईट शॅडो टीममध्ये सुरक्षारक्षक, बाऊन्सरबरोबरच महिला ड्रायव्हर यांचा समावेश असून त्या मानवी साखळीत सहभागी झाल्या. टीमच्या प्रमुख कस्तुरी रोकडे, आकांक्षा पाटील, मीनाज्‌ हवालदार, स्नेहल चव्हाण, प्रेरणा यादव, धनश्री पोवार आदींच्या नेतृत्वाखाली संयोजन झाले.

शाहिरीतून स्त्रीशक्तीला सलाम...!
शाहीर दिलीप सावंत यांच्या कन्या शाहिरा दीप्ती व तृप्ती सावंत यांनी शाहिरातून स्त्री शक्तीला सलाम केला. त्यांना मारुती रणदिवे (झिलकरी), सुरेश कांडगावकर (ढोलकी), पोपट वाघे (हार्मोनियम) यांची साथसंगत होती. दीप्ती व तृप्ती यांनी सादर केलेला पोवाड्यातील काही भाग...

‘स्त्रीशक्ती शुरमर्दीनी । राष्ट्र अभिमानी । स्वराज्य स्थापिनी ।
राष्ट्रमाता जिजाऊ आना ध्यानी ।
पराक्रमी विर येसूराणी । रण धूरंधर ताराराणी । अहिल्याबाई त्या स्वाभीमानी । 
कित्तूरची चन्नमा राणी । झाशीची लक्ष्मीराणी। अशा किती शूर वीरांगनी हा जी जी जी 

स्त्री शिक्षणाच्या आद्यक्रांतिकारक । सावित्री बाई
मानव सेवीका मदर तेरेसा । साधना आमटे ताई । 

सुनीता कल्पना चावला । अतंराळ वीरागंना । कणखर पतंप्रधान म्हणती इंदिरा गाधींना ।
राष्ट्रपती पदाचा बहुमान । प्रतिभा ताईना 
ऐक सवाल स्त्रीशक्तीचा आज तुम्हा पुढे करते ।
मला मारली नसता आजतर । मी यातील ऐक असते

ज्या राष्ट्रात ज्या समाजात  । स्त्री महिला त्यात । निर्माण होतात निर्माण होतात 
अशा अजून कित्येक महिला जगतात
मुजरा शाहिरी । त्यांच्या कर्तृत्वास ’

कस्तुरी सावेकरचे आवाहन
करवीर कन्या कस्तुरी सावेकर माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झाली असून लवकरच ती मोहिमेवर निघणार आहे. या मोहिमेसाठी कोल्हापूरकरांनी पाठबळ दिले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून तिला राष्ट्रध्वज आणि भगवा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रम उद्या (रविवारी) होणार आहे. वडणगे फाटा येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवनात सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तिने यावेळी केले.


दृष्टिक्षेपात
 महापौर निलोफर आजरेकर, गणी आजरेकर, नगरसेवक ईश्‍वर परमार यांचे उपक्रमासाठी विशेष सहकार्य मिळाले. आजरेकर परिवारातर्फे सर्वांसाठी चहाचा आस्वाद दिला गेला. तसेच ‘कॉमर्स’चे प्राचार्य डॉ. व्‍ही. ए. पाटील यांचेही सहकार्य लाभले.  
 स्त्री सन्मानासाठी झालेल्या मानवी साखळीत सहभागी महाविद्यालयीन तरुणींनी शिस्त पाळली. साखळीनंतर उपस्थितांबरोबर सेल्फी सेलिब्रेशन करत एकमेकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वाहतूक पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियोजन झाले.    

 ‘नारी शक्ती देश सावरी, पुरुष शक्ती सदैव आभारी’, ‘आम्ही दामिनी, आम्ही रणरागिनी’, ‘सन्मान करा स्त्रियांचा, लौकिक वाढवा समाजाचा’, ‘महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान’, अशा घोषणांनी बिंदू चौक दुमदुमून गेला. 

शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संकटग्रस्त महिला निवारण केंद्राविषयी (सखी केंद्र) आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रबोधन झाले. या केंद्रात महिलांवर होणारे शीारिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक अशा प्रकारच्या अत्याचारांनी पीडित महिलांना निवाऱ्याची सोय दिली जाते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com