स्वाभिमानी जगण्याला मिळाला आधार: नजमाभाभींच्या पणत्यांसाठी सरसावले अनेक हात

मतीन शेख
Thursday, 12 November 2020

‘सकाळ’च्या बातमीमुळे खरेदीस झुंबड
 

कोल्हापूर : दिवाळीच्या निमित्ताने महाद्वार मार्गावर ७२ वर्षांच्या नजमा सय्यद पणत्या विकून आपलं संघर्षी व स्वाभिमानी जीवन जगत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. हे वृत्त पाहताच नजमाभाभींच्या मदतीला अनेकजण सरसावले आहेत.

 
त्यांच्याकडून पणत्या खरेदी करत त्यांच्या स्वाभिमानी जगण्याला आधार देत आहेत. शाहूपुरीत राहणाऱ्या नजमा भाभींच्या पतीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले अन्‌ त्यांचा संसार कोलमडला; पण १० वर्षे महाद्वार रोडवर बसून पणती, उटणे विकत आहेत. काहींचा प्रतिसाद मिळतो, तर काहींचा नाही; परंतु पणती विक्रीतून जगण्याला आधार म्हणून चार पैसे जोडण्याच्या त्यांच्या धडपडीवर ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकला. ही बातमी व्हॉट्‌स ॲप, फेसबुकवर आदी सोशल मीडियावर व्हायरल झाली अन्‌ आज नजमाभाभींकडे पणती खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आणि आज त्यांच्या चेहरा आनंदाने फुलून गेला.

कार रेसर ध्रुव मोहिते यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडील सर्वच पणत्यांची खरेदी करत त्यांना आधार दिला. तसेच उमेद फौंडेशनकडून पणत्यांची ॲडव्हान्स बुकिंग त्यांच्याकडे केली आहे. महाद्वार रोडवर अनेक जण त्यांना शोधत आले. त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल त्या गलबलून गेल्या आहेत. त्यांच्या स्वाभिमानी जगण्याला कोल्हापूरकरांच्या प्रतिसादातून बळ मिळत आहे.

हेही वाचा- कोकणात थंडीने हुडहुडी; दापोलीचा पारा गेला ११.०९ अंशावर -

यंदाची माझी दिवाळी आनंदात जाणार आहे. पहिल्यांदा इतके लोक पणती खरेदीसाठी माझ्याकडे येत आहेत. ‘सकाळ’ने माझी व्यथा मांडली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आल्लाह, आई अंबाईचाच हा आशीर्वाद आहे. 
- नजमा सय्यद, पणत्या विक्रेती.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal news impact Shopping spree due