
गेल्याच वर्षी खासदार संभाजीराजे यांनी या रस्त्यांना दळणवळणासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता
राशिवडे : म्हासुर्ली पैकी धनगरवाड्यावर रस्ता करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून गैरव्यवहार झाल्याचे ‘सकाळ’च्या बातमीवरून पुढे आले. याची तातडीने चौकशी करून ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व तसा अहवाल मला द्यावा, अशा आशयाचे निवेदन आज खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहे.
म्हासुर्ली पैकी पादुकाचा धनगरवाडा, मधला धनगरवाडा व मधला धनगरवाडा ‘अ’ या तीन धनगर वाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. गेल्याच वर्षी खासदार संभाजीराजे यांनी या रस्त्यांना दळणवळणासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पैकी ३० लाख रुपये प्रत्यक्ष खर्ची पडले आहेत. केवळ माग पाडण्यापलीकडे काहीही झालेले नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार जेमतेम चार ते पाच लाख रुपयांचे काम झाले आहे. तर दुसरीकडे मानेवाडीकडून नियोजन मंडळाकडून दहा लाख रुपयांचा निधीही रस्त्यावर खर्च झाला आहे. याचेही केवळ माग पाडले आहेत. याबाबत आज ‘सकाळ’मध्ये आलेल्या वृत्तातून ही बाब पुढे आली. याची दखल घेऊन तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
हे पण वाचा - काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेवरून खेचण्यासाठी व्यूहरचना
‘येथील दुर्गम परिसराचा विचार करून मी निधी दिला होता; मात्र तो खर्ची पडल्यानंतरही एक मुलगा व मातेसह बाळाचा मृत्यू होतो हे दुर्दैवी असून, माणुसकीला धक्का देणारी बाब आहे,’ असेही या निवेदनात म्हटले आहे.
संपादन - धनाजी सुर्वे