माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे!  संभाजीराजे छत्रपती

संदीप खांडेकर 
गुरुवार, 9 जुलै 2020

स्वत:पेक्षा रयतेला महत्त्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे.

कोल्हापूर : बहुजन समाजाची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. मराठा समाजाचा सेवक म्हणून सारथीच्या बैठकीला गेलो होतो. रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची शिकवण आहे. मी मान-सन्मानाच्या पलिकडे गेलो आहे. त्यामुळे मान-सन्मानापेक्षा सारथीचे काम मार्गी लागले, याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. मंत्रालयात सारथीच्या बैठकीत संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसविण्याच्या कारणावरून शिवभक्तांत संताप व्यक्त झाला. त्या पार्श्‍वभूमीवर संभाजीराजे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

संभाजीराजे म्हणाले, ""छत्रपती घराण्याचे संस्कारच असे आहेत की, आपण रयतेचे सेवक आहोत. स्वत:पेक्षा रयतेला महत्त्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. छत्रपती घराण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कोणीही एवढा मोठा नाही. जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल. समाजाने जो सारथीचा लढा उभा केला होता. मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या. त्याच्या पूर्णतेची सकारात्मक सुरूवात झाली आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे.'' 

ते म्हणाले, ""मी बैठकीला छत्रपती म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा सेवक म्हणून गेलो होतो. बहुजन समाजासाठी माझा जन्म झाला आहे. मी मान-सन्मानापलिकडे गेलो आहे. ज्या शिवभक्‍तांनी माझ्या बसण्यावरून संताप व्यक्त केला. त्यांचा मी आदर करतो. मात्र, मला त्यापेक्षा सारथी संस्था सुरळीत चालणे महत्त्वाचे वाटते. गरीब मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, विकास घडविण्यासाठी संस्था आधार ठरणार आहे. त्यामुळे तिचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू व्हावे, हीच माझी इच्छा आहे.'' छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्ताचा व विचारांचा मी वारसदार आहे. अठरापगड जाती-धर्मांतील लोकांसाठी मला काम करायचे आहे. 

<

>

हे पण वाचा - आता हद्द झाली ; कोरोना नियंत्रण समितीवरच आली क्वारंटाईन होण्याची वेळ

दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी 

दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करून घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. 

<

>

समाजात एकी असली की सर्व काही करून घेता येतं. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने उभारलेली ही संस्था सर्वार्थाने लोक कल्याणकारी ठरेल असा विश्वास आहे, अशा भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केल्या आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji raje chhatrapati tweet on sarthi organisation