६९६९ नंबरच्या क्वाँटेसाने दिले कुपेकरांच्या भविष्याला वलय

 संदीप खांडेकर  
Tuesday, 22 September 2020

२०१४ च्या निवडणुकीत गाडीच्या नंबरवरील श्रद्धा ढळली नाही. घरातील प्रत्येक नव्या गाडीला हाच नंबर चिकटला आहे. 

कोल्हापूर :  कृष्णराव रखमाजीराव कुपेकर (देसाई) चार वेळा आमदार होते. ‘बाबासाहेब’ टोपण नावाने ते प्रसिद्ध. गडहिंग्लज तालुक्‍यातील कानडेवाडी त्यांचं गाव. सरपंच ते विधानसभा अध्यक्ष हा त्यांचा राजकीय प्रवास. त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी पेलली. ते १९९९ मध्ये सहकार राज्यमंत्री होते. नवी कोरी क्वाँटेसा त्यांच्या सोबतीला आली. तिचा नंबर ६९६९. या नंबरने त्यांच्या भविष्याला वलय मिळाले. कुपेकरांच्या घरात हाच नंबर लोकप्रिय झाला. संध्यादेवी कुपेकर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. त्यांची २०१४ च्या निवडणुकीत गाडीच्या नंबरवरील श्रद्धा ढळली नाही. घरातील प्रत्येक नव्या गाडीला हाच नंबर चिकटला आहे. 
 

बाबासाहेब कुपेकर कला शाखेचे पदवीधर. कानडेवाडीतल्या वाड्यात त्यांचे बालपण गेले. महाविद्यालयीन जीवनात राजकारण त्यांच्या अंगात मुरले. गावातल्या राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्या गळ्यात १९६५ मध्ये सरपंच पदाची माळ पडली. याचवर्षी ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जिल्हा परिषदेवर निवडून जाण्याचे वर्ष होते १९६७. त्यांना १९७२ मध्ये जिल्हा परिषदेत कृषी विभागाच्या सभापतीपदाची संधी मिळाली. चंदगड विधानसभा मतदारसंघ दुर्गम-वाड्या वस्त्यांचा. जनसंपर्काच्यादृष्टीने देहाची परीक्षा घेणारा. राजकारणाची सूत्रे त्यांच्यासाठी एकवटली. त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक १९९५ मध्ये लढवली. शेतकरी कुटुंबातील हक्काचा माणूस आमदार झाल्याची भावना मतदारांत झाली. १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा त्यांना मतदारांनी कौल दिला. 

हेही वाचा- सकाळी गावात, दुपारी कार्यालयात, ग्रामपंचायत प्रशासकांची कसरत -
सहकार राज्यमंत्री पदाची संधी त्यांना मिळाली. त्याच वर्षी ६९६९ नंबरच्या क्वाँटेसाचा सहवास त्यांना मिळाला. ते २००४ ते २००९ दरम्यान विधान सभा अध्यक्ष होते. स्कोडा ६९६९ गाडी त्यांच्या सोबतीला आली. गव्हर्मेंटची तवेरा त्यांच्या दिमतीसाठी होती. 
पुढे २००९ ते २०१२ दरम्यान ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राहिले. २०१२ मध्ये त्यांचे कर्करोगाने निधन झाले. पत्नी संध्यादेवी कुपेकर यांच्याकडे राजकारणाची सूत्रे आली. पोटनिवडणुकीसाठी त्यांचे नाव पुढे आले. गावा-गावांत ब्रॅंड झालेल्या ६९६९ गाडीचा करिश्‍मा पुन्हा चालला. प्रचार दौऱ्यात गाडीभोवती मतदारांचा गराडा दिसून आला. अपेक्षेप्रमाणे संध्यादेवी आमदार झाल्या. त्यानंतरच्या निवडणुकीतील मोदी लाटेलाही त्यांनी परतवून लावले. दोन वेळा आमदार म्हणून त्यांचे नेतृत्त्व मतदारांनी मान्य केले. त्यांच्या घरात २०१६ मध्ये फोर्ड इंडेव्हर आली. तत्पूर्वी घेतलेली स्कॉर्पिओ नुकतीच रिप्लेस करण्यात आली. 

इनोव्हाची चाके दौऱ्यानिमित्त गावा-गावात फिरत आहेत. विशेष म्हणजे गाड्यांचा नंबर बदलण्याची मानसिकता आजही नाही. लकी नंबर म्हणून नंबरकडे पाहिले जाते. वाड्या-वस्त्यांतील कार्यकर्त्यांत त्याचा लौकिक आहे. गाडीची चाके गावात यायची अवकाश, ‘आईसाहेबांची’ गाडी आली, याची वर्दी त्यांना आपसूक मिळते. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandhyadevi Kupekar car story by sandeep khandekar