अमेरिकेत ट्रम्पचा पराभव; भारतातही बदल होणार 

घनश्याम नवाथे
Friday, 6 November 2020

भाजपला पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रू वाटतो; 

बाळासाहेब थोरात यांचा इशारा 

सांगली : अमेरिकेत काळा-गोरा भेदभाव करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. जो जनतेत भेद करतो त्याचा पराभव निश्‍चित होतो. हे बदलाचे चक्र जगात सुरू आहे. त्यामुळे भारतात सुद्धा हा बदल झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिला. तसेच शेतकरी विरोधी कायदा करणाऱ्या भाजपला सध्या पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रू वाटतो अशी जोरदार टीकाही श्री. थोरात यांनी केली. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात आज सांगलीतून भव्य ट्रॅक्‍टर रॅली काढण्यात आली. सांगलीतील बसस्थानकाजवळून सुरू झालेल्या रॅलीत शेकडो ट्रॅक्‍टर सहभागी होते. रॅली नेमिनाथनगर येथील मैदानावर आल्यानंतर सांगता झाली. या रॅलीच्या सांगता प्रसंगी श्री. थोरात बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, अखिल भारतीय कॉंग्रेस चिटणीस सोनल पटेल, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील, शैलजा पाटील, डॉ. जितेश कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. थोरात म्हणाले, ""केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा राज्य तापून उठले आहे. तेथे आजही आंदोलन सुरू आहे. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना चिमटा बसला नसला तरी धोका कायम आहे. आज शिल्लक साखरेचा प्रश्‍न गंभीर असताना निर्यात बंदी केली. याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरवात केली. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे आज देशातील भाजप सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रु वाटतो. दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना केंद्र सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेते. दूध भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. तशातच कृषी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळेच कायद्याविरोधात कॉंग्रेसने यल्गार केला आहे.'' 

श्री. थोरात पुढे म्हणाले, "" केंद्र सरकारचे धोरण हे साठेबाजी आणि नफेखोरीला उत्तेजन देणारे आहे. शेतकरी, कामगार आणि नागरिकांच्या विरोधात धोरण फक्त मुठभरासाठी केले जाते. धर्माच्या नावावर मताची झोळी मागून सत्तेवर आल्यानंतर जनतेवर अन्याय केला जात आहे. आज अमेरिकेत भेदभाव निर्माण करणारे डोनाल्ड ट्रम्प पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे जनतेत भेद निर्माण करतो, त्याचा पराभव होतो. हे चक्र जगात सुरू असून तोच बदल भारतात सुध्दा झाल्याशिवाय राहणार नाही. कृषी कायदा करण्याचा अधिकार राज्याचा आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा प्रकारचे कायदे करू शकत नाही.

कायद्याविरोधात एकजुटीने शेवटपर्यंत लढण्याची गरज आहे.'' 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ""कोरोनाचे संकट येण्यापूर्वीच तिमाहीमध्ये देशाचा विकासदर पडला. दरडोई उत्पन्न कमी झाले. आज केंद्रातील मोदी सरकारने हट्टीपणातून कृषी व्यवस्थेवर आघात केला आहे. मंत्री व खासदारांशी चर्चा न करता घाईने कायदे लादले. त्याविरोधात उठाव सुरू झाला आहे. मार्केट कमिटीची व्यवस्था केंद्राला मोडून टाकायची आहे. आज पंजाब व राजस्थान सरकारने केंद्राच्या कृषी कायद्याला काटशह दिला आहे. ज्या-त्या राज्याने कृषी कायदे करण्याची तरतूद आहे. केंद्राला हा अधिकार नाही. त्यामुळे आपल्याला देखील कायद्याच्या विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. हुकूमशाही पद्धतीने शेती उद्योग घालण्याचा डाव असून त्याविरोधात जागे झाले पाहिजे.'' 

हेही वाचा- सामान्यांच्या प्रश्‍नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये; योगीराज गायकवाड -

डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले, ""लोकशाही नव्हे तर हुकूमशाही पद्‌धतीने केंद्र सरकारने चर्चा न करता कायदे केले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान करणारा हा कायदा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना समजून सांगितला पाहिजे. उद्योगपतींच्या स्वार्थापोटी हे कायदे संमत केले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने त्याविरोधात उठाव केला आहे. कायद्यामुळे मार्केट कमिटी उध्वस्त होणार आहे. त्यामुळे कायद्याविरोधात सर्वांनी एकजुठ दाखवावी.'' 

आमदार विक्रम सावंत, जयश्री पाटील, विशाल पाटील, आप्पासाहेब बिराजदार यानीही मनोगत व्यक्त केले. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महापालिका विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, नामदेवराव मोहिते, महेंद्र लाड, जि.प. सदस्य जितेंद्र पाटील, निरीक्षक तौफीक मुलाणी, वहिदा नायकवडी आदींसह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli tractor rally against farm law