चंदगडच्या शैक्षणिक क्षेत्रात "संजय गांधी' पॅटर्नचा बोलबाला...28 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण

The "Sanjay Gandhi" Pattern Is Discussed In The Education Sector Of Chandgad Kolhapur Marathi News
The "Sanjay Gandhi" Pattern Is Discussed In The Education Sector Of Chandgad Kolhapur Marathi News

चंदगड : अध्यापन हीच सेवा मानून मनापासून काम करणारे शिक्षक आणि त्यांच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांची प्रामाणिक साथ म्हणजेच वार्षिक परीक्षेतील यश या अत्यंत महत्वपूर्ण सूत्रावर नागनवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत गेली काही वर्षे आपल्या यशोपताका फडकावत ठेवली आहे. हे सूत्र वरवर साधे वाटत असले तरी तेवढेच खडतर आहे.

कामाप्रती निष्ठा, वेळ देण्याची तयारी, सातत्य यातून यश साध्य होते हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच चंदगड तालुक्‍याच्या शैक्षणिक क्षेत्रात "संजय गांधी' पॅटर्नचा बोलबाला आहे. शाळेचा करण पाटील याने 99.40 टक्के गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावला. अन्य 28 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. 

तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यात प्रसिध्दी झाल्यामुळे कोकण सीमेवरील कानूरपासून कर्नाटक सीमेवरील महिपाळगड पर्यंतचे पालक आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आग्रही असतात. इथल्या शिक्षकाला शेती, अन्य व्यवसाय, उद्योग यापेक्षा अध्यापनाला महत्व द्यावे लागते. त्यासाठीच तर सरकार आम्हाला पगार देते, असे ते सांगतात. दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत शाळेत हजर रहावे लागते.

अभ्यासिकेत विद्यार्थ्यांच्या शंका निरसन कराव्या लागतात. सण, उत्सव म्हणून सुट्टी घेता येत नाही. शाळेची ती परंपराच बनली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक हे कुटुंब आहे. सकाळी 8 ते साडे दहा या वेळेत अभ्यासिका आणि दिवसभर वर्गातील विषयवार तासिका यामुळे दीर्घ काळ ते एकत्र राहतात. प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वभाव, त्याची गुणवत्ता, अडचण शिक्षकाच्या लक्षात येते. त्यानुसार मार्गदर्शन केले जाते.

यासंदर्भात मुख्याध्यापक एम. आर. भोगुलकर म्हणाले, ""जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आमचा अभ्यासक्रम पूर्ण होतो. त्यानंतर प्रत्येक विषयाच्या किमान 15 प्रश्‍नपत्रिका सोडवून तपासल्या जातात. पालकांच्या समक्ष गुणांचे वाचन केले जाते. चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.''

कौटुंबिक अडचण असेल तर त्यावरसुध्दा मार्गदर्शन होते. या सर्वाचा परीपाक म्हणजे आमच्या शाळेचे यश असल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांच्यासह के. डी. बारवेलकर, व्ही. बी. पाटील, जी. एन. धुमाळे, एस. एस. गुरव, ए. डी. पाटील, बी. एम. पाटील, एस. एस. टक्केकर, व्ही. आर. हुलजी, एस. व्ही. पाटील यांचा यात महत्वाचा वाटा आहे. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com