कोविडवरील अभ्यासकांचे विशेष पथक कोल्हापूरला पाठविणार : राजेश टोपे

सचिन शिंदे
Sunday, 9 August 2020

सीपीआर व इचलकरंजीतील शासकीय रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टारांची टीम पाठवून तेथे स्वतंत्र ट्रेनिंग देण्याचा विचार सुरू आहे, असेही मंत्री टोपे यांनी सांगितले.

कऱ्हाड : कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोनाबाधितांची टक्केवारी 35 टक्के आहे. ती पाच टक्‍यांवर आणण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला असून त्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकारही दिले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड स्थितीची माहिती आढावा बैठक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कराडात झाली. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, काेल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावरकर, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. त्यानंतर श्री. टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मोदींच्या भाषणातील शिवछत्रपतींच्या संदर्भाबाबत उदयनराजेंचे ट्‌विट, काय म्हणाले वाचा 

श्री. टोपे म्हणाले, ""राज्याच्या तुलनेत सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यू दर जास्त आहे. त्याशिवाय रूग्णांचा संसर्गाचा वेग जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्येही चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. सध्या सरासरीची 35 टक्के असून ती केवळ पाच टक्‍क्‍यांवर आणण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ॲक्‍शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. दहा टक्‍क्‍यांच्या आत ग्रोथ रेट असेल तर आपण सेफ झोनमध्ये असतो. मात्र, त्याहीपेक्षा कमी रेट असला पाहिजे, यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला अलर्ट करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी (ता.8) 950 रूग्ण सापडले असून ही स्थिती गंभीर आहे. ती बदलण्यासाठी अधिकाधिक तपासण्या वाढवत आहोत.

धरणाचे अतिरिक्त पाणी माण खटावला द्या, एक सप्टेंबरपासून सांगलीला साेडा : पाटील  

कोल्हापूरच्या मृत्यूदरही घटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कोरानाबाधित रूग्णांचा अन्य आजारांचा अभ्यास करून कोरोना झालेल्या रूग्णांत ते अन्य आजार बळावू नयेत, यासाठी आम्ही स्वतंत्र उपचार व्यवस्था करणार आहोत.'' श्री. टोपे म्हणाले, ""मृत्यू दर घटविण्यासाठी पॉझिटीव्ह रूग्णांचे सहवासित तपसाण्याचे काम गतीने हाती घेतले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या डोंगरदऱ्यात सापडणाऱ्या रूग्णांचीही अशाच पद्धतीने तपासणी करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी ॲन्टीजेन टेस्टसह स्वॅब वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. स्वतंत्र लॅबही देण्याचा विचार आहे. कोल्हापूर जिल्हा मोठा तसेच डोंगराळही आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर वाढू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. तसेच प्रत्येक भागात पोहोचतील, अशा रूग्णवाहिका कोल्हापूर जिल्ह्यासाठी देणार आहोत.

आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा हा महत्वपूर्ण निर्णय  

याबराेबरच गरजेनुसार खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभाग राज्यभरासाठी 500 रूग्णवाहिका खरेदी करणार आहे. त्यातूनही काही कोल्हापूरला देण्यात येतील. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत साताऱ्याला 27, तर कोल्हापूर 
जिल्ह्यात 45 मोठी रूग्णालये आहेत. तेथेच नागरीकांनी उपचार घ्यावेत.'' 

कोल्हापूरात वेबिनार घेणार...

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. त्यासाठी वेबिनार घेण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय कोविडवर अभ्यास करणाऱ्या विशेष पथकाला कोल्हापूरला पाठवले जाईल. सीपीआर व इचलकरंजीतील शासकीय रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टारांची टीम पाठवून तेथे स्वतंत्र ट्रेनिंग देण्याचा विचार सुरू आहे, असेही मंत्री टोपे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Health Minister Rajesh Tope Declared Special Plan To Handle Covid 19 Situation In Kolhapur