एक मार्चनंतर जन्माला येणाऱ्या मुलीला मिळणार ठराविक रक्कम 

अभिजीत कुलकर्णी 
Wednesday, 3 March 2021

ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमाचे विविध सामाजिक संस्था व संघटनांनी कौतुक केले आहे

नागाव (कोल्हापूर) : मयत व्यक्तीच्या उत्तर कार्यासाठी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत आणि 1 मार्च नंतर जन्माला येणाऱ्या मुलीसाठी विशिष्ठ रक्कम ठेव स्वरूपात देण्याचा निर्णय नागाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. लोकनियुक्त सरपंच अरुण माळी व ग्रामविकास अधिकारी सौ. अनुपमा सिदनाळे यांनी याबाबत विशेष आर्थिक तरतूद केली असल्याचे स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमाचे विविध सामाजिक संस्था व संघटनांनी कौतुक केले आहे. शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला स्थानिक स्वराज्य संस्थांनी बळ देणे गरजेचे आहे. म्हणूनच ग्रामपंचायत स्तरावर मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला असल्याचे सरपंच अरुण माळी यांनी स्पष्ट केले. 

ग्रामपंचायतीकडून व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांच्या उत्तर कार्यासाठी रुपये 2000 ची मदत व 1 मार्च 2021 नंतर जन्म झालेल्या मुलीच्या नावे विशिष्ट रक्कमेची ठेव ठेवणे बाबत मासिक सभेत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थानी सरपंच अरुण माळी हे होते. 

यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ. अनुपमा सिदनाळे, उपसरपंच अनिल कांबळे, सदस्य, सौ. शशिकला कोळी, राजेंद्र यादव, सौ. मनिषा पाथरे, सौ. सुनिता पोवार, राजाराम वडार, सौ. भागाश्री कांबळे, महंमद मुलाणी, सौ. तेजस्विनी सोळांकुरे, भाऊसो पाटील, सौ. सुजाता लंबे आदी उपस्थित होते.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save girls kolhapur nagav gram panchayat