नाराज आहे, पण...! सावकर मादनाईक यांनी केलय 'हे' सूचक विधान 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

विधान परिषदेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, यावेळीही निराशाच वाट्याला आली. निराश आहे पण "स्वाभिमानी'शी एकनिष्ठ आहे.

जयसिंगपूर : गेल्या वीस वर्षापासून चळवळीत सक्रिय आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. दोन वेळा विधानसभा लढवली. पण अपयश आले. वेळोवेळी आश्‍वासने मिळाली. पण, पदरी निराशा आली. विधान परिषदेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, यावेळीही निराशाच वाट्याला आली. निराश आहे पण "स्वाभिमानी'शी एकनिष्ठ आहे. काही काळ थांबू मग काय ते ठरवू असे सूचक विधान, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि विधान परिषदेचे दावेदार सावकर मादनाईक यांनी "सकाळ'शी बोलताना केले. 

विधान परिषदेसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले असून या पार्श्‍वभूमीवर मादनाईक यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. बुधवारी सोशल मीडियावरही त्यांच्या भूमिकेविषयी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या पार्श्‍वभूमीवर संपर्क साधला असता ते म्हणाले, "गेल्या वीस वर्षात ऊस दरासह विविध प्रश्‍नावर आंदोलनाचे रान पेटवले. उग्र आंदोलनातून सरकारला सळो कि पळो करुन सोडले. पदाची आशा न बाळगता आजवर काम केले आहे. पक्षासाठी जे जे करणे शक्‍य होते ते केले. दोन वेळा विधानसभेत पराभव पत्करला. विधान परिषदेचे स्वप्न दाखविले जात होते. दरवेळी पर्याय म्हणून पाहिले गेले. लोकसभेआधी महाआघाडीच्या बैठकीत हातकणंगलेच्या जागेबरोबर एक विधान परिषद स्वाभिमानीला देण्याचा निर्णय झाला. त्यावेळी माझ्या नावावर चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्षात देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र मी पुन्हा बाजूला गेलो. मी नाराज आहे. पण संघटनेशी एकनिष्ठही आहे. काही काळ थांबून योग्य वेळी निर्णय घेईन.' 

हे पण वाचा - स्वाभिमानीत नाराजीनाट्य ; शेट्टींची कोंडी; अंतर्गत मदभेद चव्हाट्यावर

 

हे पण वाचा - आमदारकीसाठी शेट्टींनी स्वाभिमान विकला ; 'या' संघटनेनं केला आरोप.... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sawkar madnaik angry on raju shetty