शाळा 23पासून सुरू पण मास्क सक्तीचा

युवराज पाटील
Monday, 16 November 2020

कोल्हापूर ः शाळांच्या परिसरात सॅनिटायजेशन, प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क सक्तीचा, केवळ चारच तास शाळा, पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती, असे नियम तसेच अटीपाळून 23 नोव्हेंबरपासून (सोमवारपासून) शाळा सुरू होत आहेत. 

कोल्हापूर ः शाळांच्या परिसरात सॅनिटायजेशन, प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क सक्तीचा, केवळ चारच तास शाळा, पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती, असे नियम तसेच अटीपाळून 23 नोव्हेंबरपासून (सोमवारपासून) शाळा सुरू होत आहेत. 
तब्बल आठ महिन्यांच्या विश्रातीनंतर शाळेची घंटा वाजणार असून विद्यार्थी खरचं शाळेत हजेरी लावतात का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. 
कोरोनाच्या धास्तीनंतर पहिल्यांदाच नववी ते बारावीपर्यतचे वर्ग सुरू होत आहेत. बालवाडी तसेच प्राथमिक शाळांना अजूनही राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविलेला नाही. माध्यमिक तसेच उच्च माध्यमिकचे वर्ग प्रायोगिक तत्वावर किती प्रतिसाद देतात. त्यातून अडचणी उभ्या राहतात का? याचा अभ्यास करूनच प्राथमिक वर्गाला परवानगी दिली आहे. 
दहावी तसेच बारावीचा वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. दोन्ही वर्गाच्या परीक्षा मे मध्ये होण्याची शक्‍यता आहे. ऑनलाईन वर्ग सुरू झाले पण शिक्षक आणि विद्यार्थी ऑफलाईन जोपर्यंत एकत्र येत नाहीत. तोपर्यत शिक्षक काय शिकवतात ते विद्यार्थ्याना कळत नाही आणि विद्यार्थ्याला खरचं आकलन झाले की हे शिक्षकांना कळत नाही. दहावी तसेच बारावीवर पुढील शैक्षणिक करिअर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही वर्गाचे तास ऑफलाईन पद्धतीने होणे गरजेचे आहे. 
कोरोनामुळे शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या कॅम्पसमधील वातावरण बदलून जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क सक्तीचा असेल संबंधित विद्यार्थ्यानीच मास्क आणायचा आहे. शाळेच्या आवारात तसेच वर्ग खोल्यात सॅनिटायझेशनची व्यवस्था शाळांची राहिल. एक बेंचवर एक अथवा दोन विद्यार्थी ते सुरक्षित अंतर ठेऊन बसतील. पन्नास टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी आल्यानंतर त्यांना एक दिवस सोडून बोलवावे लागेल. शाळा ही केवळ चार तासाचीच असेल. संस्थाचालकही पहिल्यांदाच शाळांचे दरवाजे खुले करत असल्याने त्यांना तापाची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देणे मुश्‍कील होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी लागेल. विद्यार्थी गर्दी करणार नाहीत यासाठी दक्ष राहावे लागेल. 
अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने हे वर्ग तुर्तास भरू शकणार नाहीत. मराठा विद्यार्थ्यांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केले आहेत. मराठा आरक्षणास स्थगिती असल्याने प्रवेशाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे नववी, दहावी आणि बारावीचेच वर्ग तुर्तास सुरू होऊ शकतील. 

शाळांच्या सॅनिटायझेशनची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापनाची असेल. शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या प्रमाणे शाळा भरवाव्या लागतील. शाळा खरंच सुरू होतात की नाही याची माहिती घेण्यासंबंधी गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. 
- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी.

-संपादन यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School starts from 23 but masks compulsory