तयारी पूर्ण झाल्यानंतरच टप्याटप्याने शाळा सुरू होणार 

संदीप खांडेकर 
Saturday, 21 November 2020

जो पर्यंत शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत, तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक आहे

कोल्हापूर : इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रथम सर्व शिक्षकांची कोविड चाचणी व पूर्व तयारी करून टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय संस्थाचालक, पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

देशातील इतर ठिकाणी दिल्ली, मुंबई, पुणे येथे कोविड रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि दिवाळी-दसरा सणामुळे लोकांचा एकमेकांशी झालेल्या संपर्कामुळे कोविड प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती  शाहू सभागृहात आज संस्थाचालक, पदाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. 

यावेळी देसाई म्हणाले, "स्थानिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने शाळेची स्वच्छता करावी. ज्या पालकांनी संमतीपत्र दिले आहे आणि १० नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार संस्थांनी केलेल्या पूर्वतयारीनुसार शाळा सुरू कराव्यात. शिक्षकांनी प्रथम त्यांच्या स्तरावर २४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत आरटीपीसीआर चाचणी कोव्हिड केंद्रांवर करून घ्यावी. तालुका पातळीवरही कोविड केंद्रांवर शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास प्राधान्य द्यावे. ज्या शिक्षकांना खासगी प्रयोग शाळांमार्फत कोविड चाचणी करायची असेल त्यांना तशी मुभा राहील. शाळा सुरू करण्याबाबत पालकांचे संमतीपत्र अनिवार्य असावे."

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

जो पर्यंत शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत, तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक आहे. दरम्यानच्या कालावधीत कोरोना संसर्गात वाढ दिसून आली तर या निर्णयात बदल होऊन शाळा सुरु ठेवण्यास स्थगिती देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

हे पण वाचागावे बंद करून महामार्ग रोकोव्दारे 26 नोव्हेंबरचा संप यशस्वी करणार ; संघटनांचा निर्धार

२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. सर्व शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण झाल्याशिवाय व मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी लेखी संमती दिल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाहीत. यासाठी कालावधी लागणार असल्याने ७ डिसेंबरनंतर शाळा सुरु केल्या तरी त्यास संमती देण्यात आली. परंतु, त्यानंतर टप्याटप्याने योग्य ती खबरदारी व काळजी घेत, जिल्ह्यातील शाळा संस्थाचालकांनी सुरू कराव्यात, असे सांगण्यात आले.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school will start after preparation completed