esakal | स्क्रॅप व्यावसायिकाचा खून,  कोगनोळीत टाकला मृतदेह : चक्क आरोपींनी दाखविले ठिकाण

बोलून बातमी शोधा

scrap trader case body dumped in Kognoli crime marathi news}

पत्र्याच्या पेटीमध्ये मृतदेह असल्याचे आढळून येऊन व्यावसायिकाचा खून झाला असल्याचे निदर्शनास आले.

स्क्रॅप व्यावसायिकाचा खून,  कोगनोळीत टाकला मृतदेह : चक्क आरोपींनी दाखविले ठिकाण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी :  येथील हंचिनाळ रोडवरील कोंढार मळ्याजवळ असलेल्या ओढ्यामध्ये पत्र्याच्या पेटीमध्ये बंद अवस्थेत तळंदगे येथील एका स्क्रॅप गोळा करणाऱ्या व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला. रविवारी (ता. 28) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हुपरी पोलिसांनी संशयित आरोपींना कोगनोळी येथे आणून ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर पत्र्याच्या पेटीमध्ये मृतदेह असल्याचे आढळून येऊन व्यावसायिकाचा खून झाला असल्याचे निदर्शनास आले. मोहम्मद बंडू जमादार (वय 50, रा. तळंदगे) असे मयताचे नाव आहे. खून कोणी व का केला, याबाबत हुपरी पोलिस कसून चौकशी करत आहेत.

याबाबत हुपरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी

मोहम्मद बंडू जमादार (वय 50) हा स्क्रॅपचा व्यावसायिक शुक्रवारी (ता. 26) पासून गायब असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने हुपरी पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. तक्रारीला अनुसरून तपास यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर संशयित आरोपी म्हणून दोन व्यक्तींना कोल्हापूरच्या एलसीबी पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी (ता‌. 27) सायंकाळी कसून चौकशी करून संशयित आरोपींना हुपरी पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.

संशयित आरोपींकडून सखोल माहिती उपलब्ध होताच या व्यावसायिकाचा खून करून मृतदेह कर्नाटकातील कोगनोळी येथे असणाऱ्या गावाच्या पूर्वेकडील ओढ्यात टाकले असल्याची कबुली दिली होती. त्यानुसार रविवारी (ता. 28) सकाळी संशयित आरोपींना कोगनोळी येथील कोंडारमळा भागात असणाऱ्या ओढ्यावर आणून पत्र्याची पेटी टाकलेल्या ठिकाणाची माहिती प्राप्त करून घेतली. त्यांच्या माहितीनुसार ओढ्यामध्ये  पत्र्याची पेटी आढळून आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत हुपरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पेटी ओढ्यातून बाहेर काढून मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

हेही वाचा- ऐतिहासिक पावनगडावरील  शेकडोच्या संखेने सापडलेल्या तोफ गोळ्यांचे झाले स्थलांतर

नातेवाईकांना त्याची ओळख पटवून देण्यात आली. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी हुपरी येथे मृतदेह नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांनी दिली.कोगनोळी येथे बेवारस पेटीमध्ये मृतदेह असल्याची माहिती वाऱ्यासारखी  परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यासाठी निपाणी ग्रामीण पोलिस स्टेशनचे पी. एम. गस्ती यांनी मदत केली.

 महाराष्ट्रात खून करून मृतदेह कर्नाटकात टाकण्या मागचा  संशयित आरोपींचा उद्देश कदाचित वेगळा असावा. पण  पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळून  गुन्ह्याचा तपास करण्यात यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल कोगनोळीसह हुपरी परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. कोगनोळी येथे मृतदेह टाकलेल्या ठिकाणी हुपरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कोळी,  सचिन सावंत, दीपक कांबळे,  चव्हाण, जमादार उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे