
जुन्या पिढीतील शिवप्रेमी असोत किंवा जगभरातील कुठल्याही मराठी तरुणांच्या नसांनसांत आजही ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून हा पहाडी आवाज रोमांच उभा करतो.
कोल्हापूर : ‘हिंदवी राज्य स्थापून, मोठ्या हिंमतीनं, शूर शिवाजीनं, शूर शिवाजीनं....’ असा शाहिरी थाट प्रत्येक शिवजयंतीला हमखास ऐकायला मिळतो. जुन्या पिढीतील शिवप्रेमी असोत किंवा जगभरातील कुठल्याही मराठी तरुणांच्या नसांनसांत आजही ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून हा पहाडी आवाज रोमांच उभा करतो. शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांचाच हा खमका आवाज. शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्यानंतर पुतळ्याच्या रूपाने गौरवाचा मान त्यांना मिळाला. महापालिका आणि शाहीरतिलक, विशारद पिराजीराव सरनाईक विश्वस्त मंडळाच्या पुढाकाराने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणात २०१० मध्ये या पुतळ्याचे अनावरण झाले.
छत्रपती शिवरायांची थोरवी, स्वराज्य स्थापनेची गाथा पिराजीराव सरनाईक यांच्या मुखातून जशी साऱ्यांना प्रेरणा द्यायची त्याचबरोबर इतिहासाला वर्तमानाची जोड देत तत्कालीन घटना, घडामोडींवर शाहिरीतून सर्वांनाच अंतर्मुख करण्याची एक वेगळी शैलीच त्यांच्याकडे होती. शाहिरांचा जन्म शिवाजी पेठेतला. साहजिकच बालपणापासूनच शाहिरीचे संस्कार त्यांच्यावर झाले आणि पुढे राज्याच्या कानाकोपऱ्यांत त्यांनी प्रबोधनाची मशाल प्रज्वलित केली.
हेही वाचा - दुर्गरक्षणासह संवर्धनाचा वसा घेऊ हाती! -
मुंबई आकाशवाणी केंद्रावरही अनेकदा त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले. पोवाडा, फटका, ओवी, गोंधळ, लावणी अशा प्रकारांत अनेक स्वरचित रचना त्यांनी लिहिल्या आणि त्या सादर केल्या. त्याशिवाय शाहीर लहरी हैदर, ग. दि. माडगूळकर, वसंत बापट आदींच्या रचनाही त्यांनी अजरामर केल्या. ‘सावकारी पाश’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायनही केले. ‘एचएमव्ही’ व कोलंबिया कंपनीने त्यांच्या पोवाड्यांच्या विक्रमी ध्वनिफिती काढल्या. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन खासबाग मैदानात भव्य शाहिरी संमेलन आयोजित केले होते. त्याशिवाय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, रशियाचे पंतप्रधान बुलग्यानीन यांच्यासमोरही त्यांना पोवाडा सादर करण्याची संधी मिळाली.
सत्यशोधक समाजाच्या ‘शाहीरतिलक’ या किताबाबरोबरच करवीर संस्थानच्या वतीने श्रीमंत शहाजीराजे छत्रपती यांच्याकडून ‘शाहीरविशारद’ किताबानेही त्यांचा सन्मान झाला. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार, शाहीर अमर शेख, गदिमा पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला. कोल्हापूर महापालिकेनेही त्यांचा १९८६ मध्ये मानपत्र देऊन गौरव केला. त्यांच्या निधनानंतर हा सारा ठेवा जतन करण्यासाठी कला दालनाची संकल्पना पुढे आली; मात्र नंतरच्या काळात पुतळा उभारण्यावर एकमत झाले आणि तसा ठरावही झाला; मात्र प्रत्यक्ष पुतळा अनावरणापर्यंत अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत अखेर २०१० मध्ये तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. त्यावेळी महापौर सागर चव्हाण, तर उपमहापौर संभाजी देवणे होते. व्ही. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने हा पुतळा तयार करून घेतला. शिल्पकार संदीप पाटील यांनी सव्वाशे किलो ब्रांझपासून हा पुतळा साकारला आहे.
हेही वाचा - शिवजयंती 2021 : जय भवानी जय शिवाजी; जयघोषाने कोल्हापूर झाले शिवमय -
महापालिकेतर्फे मानपत्र
१४ मार्च १९८६ रोजी कोल्हापूर महापालिकेतर्फे पिराजीराव सरनाईक यांना मानपत्र देऊन गौरव झाला. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा दिमाखदार सोहळा झाला होता. माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले, तर अध्यक्षस्थानी तत्कालीन महापौर डी. एम. रेडेकर होते. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार शंकर खंडू पाटील यांची उपस्थिती होती. सुशीला रेडेकर यांच्या हस्ते सुभद्रा सरनाईक यांचा या कार्यक्रमात सत्कार झाला होता.
संपादन - स्नेहल कदम