कोल्हापुरात पहिला होमिओपॅथी दवाखाना कुणी सुरु केलेला तुम्हाला माहित आहे का..?

- सुधाकर काशीद 
शनिवार, 21 मार्च 2020

कोल्हापुरात शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी साथीच्या रोगाचा वारंवार प्रादुर्भाव होत होता. १९०० मध्ये तर प्लेगच्या साथीने धुमाकूळच घातला होता. अख्खे कोल्हापूर खाली केले होते. लोकांची राहण्याची सोय गावाबाहेर विविध माळांवर तात्पुरत्या निवारा केंद्रात केली होती. गावातील प्रत्येक घरात औषध फवारणी केली होती. सारे गाव निर्मनुष्य झाले होते. 
 

कोल्हापूर - परिस्थितीत जरुर त्या-त्या परिस्थितीत वैद्यकीय उपचार सुरु होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा दृष्ट्या राजाने साथीच्या काळात जेवढे करता येईल, तेवढे आपल्या प्रजेसाठी केले होते. त्यातलाच एक भाग म्हणून शाहू महाराजांनी साथीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पहिला होमिओपॅथी दवाखाना कोल्हापुरात सुरु केला. उपचारासाठी आणखी एक वैद्यकीय आधार प्रजाजनांसाठी मिळवून दिला. 
होमिओपॅथीचे दवाखाने भरपूर आहेत; पण होमिओपॅथीचा सार्वजनिक दवाखाना हा प्रकार देशात पहिला होता. या दवाखान्याचे नाव ‘अहिल्याबाई दवाखाना’ असे ठेवण्यात आले. हा दवाखाना साथीच्या काळात तर उपयोगी पडलाच; पण पुढेही तो चालू राहीला. विशेष हे की, आजही हा दवाखाना सुरु आहे. शाबुदाण्याच्या गोड गोळ्याचा दवाखाना अशी त्याची ओळख आहे.

वाचा - कोल्हापुरात कुठे दिली जायची फाशीची शिक्षा ? वाचा कोणतं आहे ते ठिकाण..

हा दवाखाना भाऊसिंगजी रोडवर गुजरी कॉर्नरलाच आहे. खुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरु केलेला हा दवाखाना आता महापालिकेच्या ताब्यात आहे. 
एका छोट्या इमारतीत हा दवाखाना आहे. होमिओपॅथी उपचार महाग असे म्हणतात; पण या दवाखान्याची फी आजही फक्त पाच रुपये आहे. किंबहूना इतका स्वस्त दवाखाना असल्यामुळे ही त्याचे महत्व कमी आहे. कारण कोल्हापुरात सर्वात अधिक फी घेतला जाणारा दवाखाना सर्वात चांगला अशी महत्वाची पद्धत आहे. 

त्यामुळे केवळ पाच रुपयात सेवा देणाऱ्या या दवाखान्याकडे कोल्हापूरकरांनी आणखी लक्ष देण्याची गरज आहे. कारण हा दवाखाना होमिओपॅथी मधील देशातील पहिला सार्वजनिक दवाखाना आहे. आणि तो अनेक दुर्धर आजारातही रुग्णांना आधार आहे. या दवाखान्याच्या प्रमुख म्हणून डॉ. हिरेमठ काम पाहात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahu Maharaj opened the first homeopathy hospital in Kolhapur to treat the ailment