'त्या' दोघा सराईत लुटारूंना शाहुपुरी पोलिसांनी केली अटक...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

मोटारसायकलवरून मोबाईल हिसकावण्याचे प्रकार ; पाच गुन्हे उघड ; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर - मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघा सराईत लुटारूंना शाहुपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले. दोघांकडून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले.

अटक केलेल्या संशयितांची नावे : राज अंजुम मुल्ला (वय 21, मूळ रा. राजेंद्रनगर) आणि सतिश राजेश बाटुंगे (वय 22, रा. मोतीनगर, सध्या दोघे रा. कदमवाडी) अशी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शहर परिसरात पायी मोबाईलवरून बोलत जात असलेल्या नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला.

वाचा - १९५८ साली अंबाबाई मंदिरातील बुजवण्यात आलेले ते कुंड परत खुले होणार...

असा लागला छडा...

कोविडच्या संकटामुळे सात वर्षाच्या आतील शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यातील संशयितांना जामीन व पॅरोलवर न्यायालयाच्या परवानगीने सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक महिन्यापूर्वी संशयित राजू मुल्ला तर तीन महिन्यापूर्वी सतिश बाटुंगे हे दोघे जामीनावर बाहेर आल्याची माहिती मिळाली. यापूर्वी त्या दोघांवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्या दोघाना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. यात त्या दोघांनी मोटारसायकलवरून पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रुईकर कॉलनी परिसरातील दोन, वाशी नाका व तपोवन मैदान परिसरातील प्रत्येकी एक लुटीसह चोकाक येथील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. त्या दोघांकडून मोबाईल संच, मोटारसायकल असा 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

मित्राच्या मोटारसायकलचा वापर...

दोघा संशयितांनी गुन्ह्यात मित्राच्या मोटारसायकलचा वापर केला. अंधाराचा आधार घेत त्यांनी गुन्हे केले की जेणे करून सीसी टीव्हीत ते कैद होऊ नयेत याची काळजीही ते घेत असल्याचे माहिती चौकशीत पुढे आली. ही कारवाई शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कडकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रकाश भंडारे, कर्मचारी अशोक पाटील, वसंत पिंगळे, प्रशांत घोलप, किरण वावरे, युवराज पाटील आदींनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahupuri police arrested two robbers who snatched a mobile phone