पालकमंत्र्यांनी भरला घरफाळा आता तुम्ही देणी द्या नाहीतर कारखान्याच्या दारात उपोषणाला बसू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 March 2021

शारंगधर देशमुख ः असेसमेंटमधील त्रुटी, प्रशासनाचा दोष 

कोल्हापूर : महापालिकेने डी. वाय. पी. सिटी मॉल या मिळकतीचे असिसमेंट करून त्याला जो घरफाळा लावला तो पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भरला. असेसमेंटमध्ये त्रुटी असेल, तर तो प्रशासनाचा दोष आहे. त्याला पालकमंत्री किंवा त्यांचे कुटुंबीय जबाबदार नाहीत, असे स्पष्टीकरण माजी गट नेते शारंगधर देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर 10 कोटींचा घरफाळा बुडवल्याचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली. 

देशमुख म्हणाले, "पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर ज्या मिळकती आहेत. त्याला महापालिकेने जो घरफाळा लावला. तो त्यांनी पूर्णपणे भरला आहे. घरफाळ्यात जर काही त्रुटी असतील, तर तो प्रशासनाचा दोष आहे. त्याचा पालकमंत्री पाटील यांच्याशी काही संबंध नाही. महाडिकांनी आदर्श भीमा वस्त्रम इमारतीमध्ये पार्किंगचा वापर गोदामासाठी केला. या मिळकतीच्या असेसमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर दवाखाना, जनावरांचा गोठा दाखवला आहे. 

ताराबाई पार्क कृष्णा सेलिब्रेटी इमारतींमधील पार्किंगच्या जागेत गाळे काढून ते व्यावसायिकांना विकले आहेत. भीमा एज्युकेशन सोसायटी, पेट्रोलपंप, हॉस्टेल, घोडे तबेला या ठिकाणी भोगवटाधारक असणाऱ्या महाडिक यांनी कागल नगरपरिषदेचा घरफाळाही भरलेला नाही. पंढरपूर कारखान्यातील कामगारांचा 21 महिन्यांचा पगार दिला नाही. 20 महिन्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरलेला नाही. चालू हंगामातील उसाचे बिल दिलेले नाही. येत्या आठ दिवसांत ही देणी दिली नाहीत, तर आमचे कार्यकर्ते कारखान्याच्या दारात उपोषणाला बसणार आहेत.' 
या पत्रकार परिषदेला माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर भूपाल शेटे, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, संदीप नेजदार उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या विकासात महाडिकांचे योगदान काय ? 
खासदार असताना धनंजय महाडिक यांनी महापालिकेसाठी चार आणे देखील निधी आणला नाही. राजाराम कारखाना, गोकुळ दूध संघ याची स्थापना महाडिकांनी केली नाही. उलट त्यांनी या संस्थांमध्ये जाऊन व्यवसाय केला. महाडिकांनी कारखाना काढला. तो पण कर्नाटकात, जिल्ह्यात का काढला नाही? त्यांना एकही संस्था चालवता आली नाही, अशी टीका देशमुख यांनी केली.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharangdhar deshmukha criticize on satej patil political marathi news