आमदारकीसाठी शेट्टींनी ताळतंत्र सोडले ः भारतीय जनता पक्षाचा आरोप

ओकांर ध्रर्माधिकारी
गुरुवार, 16 जुलै 2020

याबाबतचे पत्रक जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बाजीराव देसाई यांनी प्रसिद्धीस दिले आहे. धारावी झोपडपट्टीमध्ये रा. स्व. संघाने कोरोना कालावधीत केलेल्या सेवा कामाची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यावर राजू शेट्टी यांनी टीका केली. या टीकेला आज पत्रकातून उत्तर दिले.

कोल्हापूर ः कोणतीही माहिती न घेता माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. संघाने राज्यभर काम करावे, असा उपहासात्मक सल्लाही दिला. शेट्टी त्यांनी रा.स्व.संघाच्या सेवा कामाची माहिती घ्यावी. तसेच खासदारकी गेल्यापासून कोणते सामाजिक कार्य केले, त्याचीही माहिती जनतेला द्यावी. आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवणाऱ्या शेट्टी यांनी ताळतंत्र सोडले आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. 
याबाबतचे पत्रक जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बाजीराव देसाई यांनी प्रसिद्धीस दिले आहे. धारावी झोपडपट्टीमध्ये रा. स्व. संघाने कोरोना कालावधीत केलेल्या सेवा कामाची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यावर राजू शेट्टी यांनी टीका केली. या टीकेला आज पत्रकातून उत्तर दिले. 
पत्रकात म्हटले आहे की, ज्या-ज्यावेळी विविध आपत्ती येतात. त्या-त्यावेळी रा. स्व. संघाचे स्वयंसेवक कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता झोकून देऊन काम करतात. शेट्टी यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी यांचे नेतृत्व करण्याचे ढोंग करून आजपर्यंत त्यांना फसवले. आता त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात. यातूनच आपल्या कर्तृत्वाची उंची दिसून येते. संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून सत्तेच्या मोहापोटी स्वतःचेच नाव पुढे रेटण्यात आपण धन्यता मानली. ज्या महाविकास आघाडीचे गोडवे शेट्टी सतत गात असतात. त्याच आघाडी सरकारच्या वीज बिलाची ते होळी करतात. महाविकास आघाडी सरकारने सरसकट कर्ज माफीची घोषणा केली होती, त्याचे काय झाले? सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या सरकारने काय केले? अशा एक नव्हे, तर अनेक प्रश्नाची उत्तरे प्रलंबित असताना व महाराष्ट्रातील सत्ताधीशांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असताना फक्त स्वत:च्या आमदारकीसाठी आपण रा. स्व संघावर टीका केली आहे. त्यांनी रा. स्व. संघाच्या संकेतस्थळावर जाऊन आधी संघाच्या सेवाकार्याची माहिती घ्यावी. खासदार पद गेल्यानंतर आपण समाजासाठी काय केले, याचीही माहिती तुमच्या संकेतस्थळावर द्यावी, असे आव्हान पत्रकातून केले गेले आहे. 
-संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shetty leaves Taltantra for MLA: BJP's allegation