कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेने समोर 'ही' आहेत आव्हाने...

Shiv Sena is facing challenges in the upcoming Kolhapur Municipal Corporation elections
Shiv Sena is facing challenges in the upcoming Kolhapur Municipal Corporation elections

कोल्हापूर - महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढणार असली तरी निवडणुकीत खरी कसोटी शिवसेनेचीच लागणार आहे. गेल्यावेळी ४० प्लसचे स्वप्न पाहिले आणि प्रत्यक्षात चार जागा पदरात पडल्या. यावेळी आहे त्या चार जागा राखण्याचेच मूळ आव्हान आहे.

कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसकडून आमदार चंद्रकांत जाधव विजयी झाले आणि शिवसेनेचा हक्काचा बालेकिल्ला निसटला. कसबा बावड्यातून जाधव यांना मताधिक्‍य मिळाले. पालकमंत्री सतेज पाटील यांचा प्रभाव असलेला हा भाग आहे. महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तरी बावड्यातील सहा प्रभागांत सक्षम उमेदवार सेनेला शोधावा लागणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे तिकीट वाटपाची सूत्रे असली तरी जिल्हाप्रमुखांच्या भूमिकेला महत्त्व असणार आहे. दोन्ही जिल्हाप्रमुख हे शहरातील आहेत. क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील वैर जगजाहीर आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळेच सेनेसमोर अडचणी निर्माण आहेत.

कोल्हापूर उत्तरमध्ये ५३ प्रभागांचा समावेश होतो. यात नियाज खान, राहुल चव्हाण व प्रज्ञा उत्तुरे शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. खान यांचा ४० टक्के प्रभाग दक्षिण मतदारसंघात येतो.अभिजित चव्हाण यांचा प्रभाग दक्षिण मतदारसंघात मोडतात. ‘दक्षिणे’तील २७ प्रभागांचा समावेश होता. तेथेही आमदार ऋतुराज पाटील पर्यायाने पालकमंत्री पाटील यांचे तिकीट वाटपात वर्चस्व राहणार आहे.

पूर्वीच्या निवडणुकीच अनुभव असा आहे, की विरोधी पक्षातील उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी काही ठिकाणी अपक्षांना बळ देण्याचा प्रयत्न होतो. गेल्यावेळी शिवसेनेकडे तिकिटासाठी गर्दी होती. काँग्रेस त्यावेळी बॅकफूटवर असूनही सतेज पाटील यांनी किल्ला लढवत २७ जागा खेचून आणल्या. राष्ट्रवादीला मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. १५ जागांवर या पक्षाला समाधान मानावे लागले. निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्रित येण्याची शक्‍यता असली तरी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या वर्चस्वात शिवसेनेसमोर टिकून राहण्याचे आव्हान असेल. स्थानिक नेत्यात टोकाचे मतभेद आहेत. लोकसभा निवडणुकीला नुसता वरवर प्रचार कुणी केला, नंतर विधानसभेला गद्दारी कुणी केली, हे सर्वाना ठाऊक आहे.

विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर यांना ७५ हजारांहून अधिक मते पडली आहेत. प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचे मतदान वाढत गेले, ही जमेची बाजू असली तरी विधानसभा निवडणुकीचे संदर्भ अणि महापालिका निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे असतात. विधानसभेला शिवसेनेला मागील दोन निवडणुकीत साथ मिळाली तरी यावेळी काँग्रेसने बाजी मारली. गेल्या वेळी श्री. क्षीरसागर हे आमदार होते. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे शिवसेनेला मतदारसंघात टिकून राहण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com