ऐन परीक्षेच्या तोंडावर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचे आंदोलन, कामकाजावर बहिष्कार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

बुधवार (ता.30) पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ आणि जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज लेखणी, अवजार बंद आंदोलन सुरू केले. बुधवार (ता.30) पर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि आश्‍वासित प्रगती योजनेची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 

शुक्रवार (ता.1) पासून अंतिम वर्षाच्या आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची लेखणी सुरू मात्र आंदोलनामुळे विद्यापीठ प्रशासनाची लेखणी बंद असेच चित्र सध्या दिसत आहे. 

या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ कृती समितीअंतर्गत शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, शिवाजी विद्यापीठ ऑफिसर फोरम, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या संघटना सहभागी झाल्या आहेत. आज सकाळी 10.30 वाजता आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी विद्यापीठातील मुख्य इमारतीमध्ये सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणांच्या माध्यमातून आपल्या मागण्यांचा पुनर्उच्चार केला. परीक्षा विभागासमोरही ठिय्या आंदोलन झाले. त्यानंतर अतुल एतावडेकर, संजय कुबल आणि आनंद खामकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आंदोलकांच्या मागण्या आणि शासनाची भूमिका याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर दिवसभर सर्व कर्मचारी अधिकारी आपल्या जागेवर बसून होते. त्यांनी लेखणी, अवजार बंद आंदोलन केले. 

बुधवार (ता.30) पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल, असे सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी सांगितले. 

संघटनांच्या प्रमुख मागण्या 
- सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुनजीर्वित करून ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी. 
- अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर पदासाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करा. 
- तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली तंत्रशास्त्र विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालये यांना पाच दिवसांचा आठवडा करा. 
- विद्यापीठे, महाविद्यालयातील रिक्त पदांची तत्काळ भरती करा. 
- शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाच्या अनुषंगाने सेवेनंतरची तीन लभांची योजना 1 जानेवारी 2016 पासून लागू करावी. 

हे पण वाचा -  कोल्हापुरात पावसाची रिपरिप ; ९ बंधारे पाण्याखाली

 

परीक्षेची तयारी अपूर्णच 
लेखणी, अवजार बंद आंदोलनात परीक्षा विभागही सहभागी झाला आहे. हे आंदोलन बुधवार (ता.30) पर्यंत सुरू असणार असल्याने परीक्षेच्या तयारीचे काम अपूर्णच राहणार आहे. त्याचा परिणाम अंतिम वर्षाच्या परीक्षांवरही होणार आहे. 

हे पण वाचा -  कोल्हापुरातील या रूग्णालयात सर्वाधिक कोरोनामुक्त

 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivaji university kolhapur workers protest