नांदी नव्या संधींची : कोल्हापुरात शूटिंग सीझन होणार स्टार्ट...!

shooting season will start from October Ahead of new opportunities
shooting season will start from October Ahead of new opportunities

कोल्हापूर : चित्रपंढरी म्हणून देदीप्यमान इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या कलापूरची वाटचाल आता पुन्हा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी ‘फिल्मसिटी’ म्हणून होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांतील विविध सकारात्मक स्थित्यंतरांमुळे आता येथे सर्वच माध्यमांतील शूटिंगला बहर येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सद्यस्थितीचा घेतलेला वेध...                                                                            
कोरोनाचा कहर, लॉकडाउनचे विविध टप्पे आणि त्यातील सर्व अडचणींवर मात करून आता येथे विविध प्रोजेक्‍टना प्रारंभ होणार आहे. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून शूटिंग सीझनलाच प्रारंभ होणार असून, चित्रपटाबरोबरच मालिका, वेबसीरिज आणि कॉर्पोरेट जाहिरात अशा सर्वच माध्यमांतील शूटिंगला येथे सुरवात होईल. 

दोन मराठी चित्रपट, लॉकडाउनच्या काळात बहुचर्चित ठरलेल्या एका वेबसीरिजचा सिक्वेल, एक बिगबजेट हिंदी वेबसीरिज आणि तीन कॉर्पोरेट जाहिरातींचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, एकूणच बदललेले अर्थकारण, कमी झालेला रोजगार अशा सर्वच पार्श्‍वभूमीवर येथे घडत असलेली ही सकारात्मक स्थित्यंतरे म्हणजे रोजगाराच्या नव्या संधींची नांदी ठरणार आहे. ही शूटिंग सुरू होताच किमान पाचशे ते सहाशे स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांना रोजगार मिळेल, असे आशादायी चित्र सध्या आहे.

बदलाच्या दिशेने...
चित्रपट, मालिका किंवा लघुपटांची निर्मिती कोल्हापूरला नवीन नाही. किंबहुना अनेक नव्या संकल्पना या क्षेत्रात कोल्हापूरने पुढे आणल्या आणि त्या यशस्वीही केल्या; पण बदलत्या काळात आता ‘ओटीटी’ अर्थात ‘ओव्हर दी टॉप’ प्लॅटफॉर्म सर्वात ॲडव्हान्स प्लॅटफॉर्म समजला जातो. लॉकडाउनच्या काळात थिएटर बंद असताना याच प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे, वेबसीरिज रिलीज झाल्या आणि त्यांनी लोकांचे मनोरंजन केले. वर्षापूर्वी येथील विविध लोकेशन्सवर शूटिंग झालेली ‘समांतर’ ही तगडी स्टारकास्ट असलेली वेबसीरिजही याच प्लॅटफॉर्मवर हिट ठरली. आता तर हिंदीतील बिगबजेट वेबसीरिजसाठीही येथील लोकेशन्सला मागणी असून त्यापैकी एका वेबसीरिजच्या शूटिंगला ऑक्‍टोबरमध्ये प्रारंभ होणार आहे.    

 ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेसाठी चित्रनगरीत पहिल्यांदाच दोन एकर परिसरात भव्य सेट आकाराला येत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण होऊन त्यानंतर प्रत्यक्षात शूटिंगला प्रारंभ होईल. कोल्हापुरातील कलाकार व तंत्रज्ञांना यानिमित्ताने किमान चार वर्षे हमखास रोजगार मिळणार आहे. यानिमित्ताने पर्यटनालाही नक्कीच चालना मिळेल. 
- संतोष फुटाणे, कलादिग्दर्शक, दख्खनचा राजा जोतिबा.


दृष्टिक्षेपात संधी...
 स्थानिक अनुभवी कलाकार व तंत्रज्ञांची संख्या मोठी
 एका सिनेमाचे शूटिंग सुरू झाले तर किमान शंभर जणांना रोजगार
 कोरोनामुळे मुंबईसह इतर मेट्रोसिटीज्‌मधून परतलेल्या या क्षेत्रातील भूमिपुत्रांना नव्या संधी
 ऑक्‍टोबरपासून किमान पाचशे ते सहाशे जणांना रोजगार

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com