कोल्हापुरात दुकाने खुली झाली; पण गिऱ्हाईकच नाही

कोल्हापुरात दुकाने खुली झाली; पण गिऱ्हाईकच नाही

कोल्हापूर ः सकाळी नऊ वाजता बाजारपेठेतील दुकाने उघडतात न उघडतात तोपर्यंत उन्हाचा तडाखा सुरू होतो. डोक्‍यावर सूर्य जसा तळपत जातो, तशी वर्दळ कमी होण्यास सुरवात होते. बारानंतर बहुतांशी रस्त्यावर चिट पाखरूदेखील नजरेस पडत नाही. दुपारचे चार वाजतात न वाजतात तोपर्यंत दुकाने बंद करण्याची लगबग. पाच वाजता तर शटर डाऊन अशा विचित्र अवस्थेत शहरातील व्यापारी तसेच दुकानदार सापडले आहेत. दुकाने खुली झाली खरी; पण गिऱ्हाईकच नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. दुकानांची वेळ चुकीची असून ती सात पर्यत वाढवावी अशी मागमी व्यावसायिकांतून होत आहे. 
कोरोनामुळे लॉकडाउनच्या वेदना सहन केल्यानंतर कुठेतरी चार पैसे पदरात पडतील म्हणून दुकाने उघडली गेली. सुरवातीला सम तसेच विषम तारखांची अट घालण्यात आली. नंतर ती काढून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी वेळ दिली गेली. किराणा भुसारा दुकानदारांपासून ते सर्वच प्रकारचे व्यापारी. रस्त्यावर विक्री करणारे नव्या वेळेमुळे अडचणीत आले आहेत. उन्हाचा पारा सध्या 38 अंशांवर गेला आहे. सकाळी नऊला सूर्याकडे नजर गेली की, भिरभिरायला सुरवात होते. उन्हापासून बचाव करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. 
नऊला दुकानाचे शटर उघडले की, दुकानदारांच्या नजरा गिऱ्हाईकांकडे लागतात. तासाभरात कधीतरी एखाद्या गिऱ्हाईकाची एंट्री होते. दिवसभरात आता कुणीतरी येईल, थोड्या वेळाने कुणी तरी येईल, याची प्रतीक्षा असते. दुपारी एक ते चार या तीन तासांत तर गिऱ्हाईकच होत नसल्याची तक्रार आहे. दुकानगाळे जे भाड्याने चालवतात त्यांची अवस्था तर फार वाईट. लॉकडाउनमध्ये मालकाला कसेबसे निम्मे भाडे दिले. आता दुकाने उघडली तरी मालक शंभर टक्के भाडे मागणार. ते द्यावे गिऱ्हाईक तर अशा विचित्र मानसिकतेत ते सापडले आहेत. 
महाद्वार रोड परिसरात सुमारे तीनशे हून अधिक दुकाने आहेत. पूर्वी महाद्वार रोडवर फिरायला जाण्याची एक क्रेझ होती. बाजारपेठ जशी अन्य भागात विस्तारित गेली. तशी क्रेझ कमी होत गेली. मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे दुकानदार, व्यापाऱ्यांचे अर्थकारण बिघडले. लोकांच्या हाती पैसे नसल्याने ते ही खरेदीसाठी बाहेर पडायला तयार नाहीत. 
राजारामपुरी, शाहूपूरी व्यापारी पेठ, लक्ष्मीपुरी, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, बागल चौक परिसर, सुभाष रोड, शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, चप्पललाईन, गुजरी या भागात उन्हामुळे गिऱ्हाईक नसल्याची अवस्था आहे. दुकाने खुली आहेत, पण गिऱ्हाईक मात्र नाही, अशीच सार्वत्रिक तक्रारीचा सूर आहे. 

दुकाने बंद करण्याची वेळ चुकीची असल्याचा फटका दुकानदारांना बसला आहे. महाद्वार रोड परिसरात सुमारे तीनशे दुकाने आहेत. सर्वाचीच अवस्था बिकट झाली आहे. लॉकडाऊननंतर थोडा दिलासा मिळेल, असे वाटले पण पाच वाजता दुकाने बंद करण्याच्या अटीमुळे आगीतून उठून फुफाट्यात, अशी अवस्था झाली आहे. वेळ सायंकाळी सातपर्यत वाढवून द्यावी.'' 
अभिजीत बागलकोटे 

ज्यांनी दुकानगाळे भाड्याने दिले आहेत, अशांची फार मोठी अडचण झाली आहे. भाडेकरूंना गिऱ्हाईक नसल्याने त्यांना भाडे देणे शक्‍य होत नाही. ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भाड्यावर चालतो, अशांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. 
- सचिन जाधव 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com