चांदी व्यवसायाला झळाळी नाहीच

सचिनकुमार शिंदे
Wednesday, 3 June 2020

भारताची चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) येथील चांदी व्यवसायाला अद्यापही झळाळी मिळालीच नाही. कोरोनाने या व्यवसायाला ग्रासले असून काळवंडलेल्या या व्यवसायाला झळाळी केव्हा येणार याकडे पंचक्रोशीची नजर लागून राहिली आहे. 

पट्टणकोडोली : भारताची चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) येथील चांदी व्यवसायाला अद्यापही झळाळी मिळालीच नाही. कोरोनाने या व्यवसायाला ग्रासले असून काळवंडलेल्या या व्यवसायाला झळाळी केव्हा येणार याकडे पंचक्रोशीची नजर लागून राहिली आहे. 

सुमारे सव्वाशे वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या हुपरीतील चांदी व्यवसाय भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. येथील चांदीच्या आभूषणांना विशेष मागणी आहे. हुपरीपाठोपाठ पट्टणकोडोली, रेंदाळ, यळगूड, इंगळी, तळंदगे या गावातही हा व्यवसाय विस्तारला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रालगत असणाऱ्या कर्नाटक सीमा भागातील मांगूर व बारवाड या गावातही व्यवसायाचे जाळे पसरले आहे. या पंचक्रोशीत सुमारे तीन हजार चांदी व्यावसायिकांसह 18 हजार चांदी मजूर सध्या यावर अवलंबून आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ही अनेक चांदी मजुरांना या चंदेरीनगरीने काम दिले आहे. 

येथील चांदी हस्तकला व्यवसायच या परिसराची अर्थवाहिनी आहे. त्यामुळेच येथील इतर अनेक व्यवसायावर चांदीची चांगली वाईट सावली नेहमीच पडत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात झालेल्या लॉकडाउनचा परिणाम या हस्तकला व्यवसायावर झाला आहे. हजारो महिला आणि कामगार या काळात बेरोजगार झाले आहेत. 

लग्नाचा सिझन वाया 
येथे बनवलेली चांदीची आभुषणे भारताच्या कानाकोपऱ्यात पोचतात. त्या बदल्यात कच्ची-पक्की चांदी व नवीन आभुषणांची ऑर्डर मिळत असते. त्यानुसार पुढील हस्तकलेचे काम सुरू होते, मात्र सध्याच्या लॉकडाउनमुळे येथील तयार माल बाहेर जाणे बंद झाले, तर नवीन मिळणाऱ्या ऑर्डरीही बंद झाल्या. परिणामी नवीन कामच उपलब्ध नसल्याने चांदी व्यावसायिकांबरोबरच चांदी मजुरांवरही आर्थिक संकट उभे राहिले आहे. लग्नसराईचे महिने म्हणजे सोने-चांदी व्यवसायातील सर्वात मोठा सिझन समजला जातो, मात्र लॉकडॉउनमुळे हा सिझन तर वाया गेला आहे. पावसाळ्यातही या व्यवसायावर मंदीचे सावट पसरते. त्यामुळे या चंदेरी नगरीवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. 

परराज्यात जाण्याची मुभा देण्याची गरज
परराज्यात जाण्याची मुभा नसल्याने येथील चांदी उद्योजकांना ऑर्डरी घेता व देता येत नाहीत. सद्य:स्थितीत यामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. शासनाने या बाबीचा विचार करून व्यावसायिकांना शिथिलता देण्याची गरज आहे. 
- मच्छिंद्र जाधव, होलसेल सराफ व्यावसायिक 

रोजीरोटीचा प्रश्‍न
लॉकडाउनपूर्वी अनेक ऑर्डरी बनवून तयार आहेत; मात्र व्यापाऱ्यांनी मालच उचलला नसल्याने तो तसाच पडून आहे. पुढील ऑर्डरी तर बंदच झाल्या आहेत. त्यामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 
- सचिन सदाशिव पाटील, तोड वाळ उत्पादक 

दृष्टिक्षेपात चांदी व्यवसाय 
- हुपरी व परिसरात व्यावसायिक- 3 हजार 
- काम करणारे कामगार- 18 हजार 
- परिसरातील व्यापलेली गावे- 10 
- अप्रत्यक्षपणे मिळणारा रोजगार- 10 हजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silver Business Not Recover Kolhapur Marathi News