पुष्पाताई, परखड  भूमिका अन्‌ कोल्हापूर...! 

संभाजी गंडमाळे
Saturday, 3 October 2020

व्यवस्थेला थेट प्रश्‍न विचारण्याचे धैर्य त्यांनी तरूण कार्यकर्त्यांच्या मनात नेहमीच पेरलं.  

कोल्हापूर : स्पष्ट वैचारिक भूमिकेतून लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा आग्रह कायम जपणाऱ्या जेष्ठ विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे निधन झाले आणि त्यांच्या कोल्हापूरविषयीच्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला. येथील महिला चळवळ असो, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह असोत किंवा एकूणच सामाजिक चळवळीसाठी त्यांनी एक मार्गदर्शक म्हणून नेहमीच खमकी भूमिका बजावली. 

साहित्य, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, कलाशास्त्र असो किंवा समाजशास्त्रांर्पंत विविध ज्ञानशाखांचा पुष्पाताईंचा गाढा व्यासंग. महिला दिनाचे औचित्य साधून 2003 साली त्या कोल्हापुरातील विविध कार्यक्रमांत सहभागी झाल्या होत्या. यानिमित्ताने "जागतिकीकरण आणि स्त्रिया' या विषयावर त्यांनी विस्तृत मांडणी केली होती. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या राजर्षी शाहू स्मृती पुरस्काराने त्यांना 2018 साली सन्मानित करण्यात आले. तमाम कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कार वितरणाचा सोहळा झाला होता.

हेही वाचा- कोरोना खर्चाची १०० कोटींकडे झेप : कोविड योद्धांना करावा लागतोय सामना -

वयाच्या ऐंशीतही त्यांनी तितक्‍याच सळसळत्या उत्साहात हा पुरस्कार स्वीकारताना शाहूकार्य आणखी पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला होता. संयुक्त महाराष्ट्र, गोवामुक्ती आंदोलन, असंघटित कामगारांचे विविध प्रश्‍न असोत किंवा अगदी महागाईविरोधातील आंदोलनात त्यांचे सक्रीय योगदान लाभले. यानिमित्ताने कोल्हापुरातील सर्व सामाजिक संस्था, संघटनांशी त्यांचा विद्यार्थीदशेपासूनचा स्नेह होता आणि त्यांनी तो अखेरपर्यंत जपला. येथील विविध व्याख्यानमाला असोत किंवा शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रमांसाठी अनेकदा त्या प्रमुख वक्‍त्या म्हणून उपस्थित राहिल्या. व्यवस्थेला थेट प्रश्‍न विचारण्याचे धैर्य त्यांनी तरूण कार्यकर्त्यांच्या मनात नेहमीच पेरलं.  

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social activist Pushpa Bhave Passed Away kolhapur and pushpa bhave