....आणि मामाचे गावही गहिवरले!

राजू पाटील
Sunday, 22 November 2020

सवंगड्यांनी दिला आठवणींना उजाळा; संग्राम यांचे येळवडेत शिक्षण

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : संग्राम शहीद झाल्याची बातमी ऐकून येळवडे (ता. राधानगरी) येथील त्यांचे सवंगडी अक्षरशः गहिवरले. याच परिसरात त्यांचे माध्यमिक शिक्षण आणि भोगावती महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाल्याने ते या परिसरात चांगलेच रुळले होते. सैनिक भरतीपूर्व शिक्षण त्यांनी येथेच घेतले होते. त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. हे गाव त्यांचे आजोळ असल्याने मामाच्या गावावरही शोककळा दिसून आली.

निगवे खालसा (ता. करवीर) येथील संग्राम पाटील पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. आज सकाळी सोशल मीडियावरून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. येळवडे हे त्यांच्या मामाचे गाव. बालपण मामाच्या घरात गेल्याने पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण येथे, तर भोगावती महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झाले. क्रीडा आणि जिमचे प्रशिक्षण येथेच घेऊन त्यांनी सैन्यात भरती होण्याची मनीषा बाळगली. वीरमरणाची बातमी गावात समजताच त्यांचे सवंगडी अक्षरशः गहिवरले. त्यांच्या शाळेतील सहवासाच्या आठवणी काढून प्रत्येक जण त्यांना आठवणींची श्रद्धांजली वाहत होता. त्यांच्याबरोबरच सैन्यात भरती झालेले गावातील विक्रम सावेकर सुटीवर आले आहेत.

हेही वाचा- पतीकडून पत्नीची सोशल मीडियावरून बदनामी

संग्राम यांच्या वीरमरणाचा त्यांनाही धक्का बसला. कारण अकरावी-बारावीला सोबत होते आणि जिमलाही सोबत जात होते. भरतीचा काळ संपल्यावर त्यांनी वरिष्ठ हुद्दा मिळाल्यावर आपला कालावधी वाढवून घेतला. आज त्यांच्या वीरमरणाची बातमी समजली. मात्र, आजीला ही बातमी कोणी सांगितली नाही. संग्राम ज्या शाळेत शिकले, त्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी शंकर कांबळे यांनीही त्यांच्या आठवणी सांगितल्या. शांत, सुस्वभावी विद्यार्थी म्हणून ते परिचित असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संग्राम आणि मी महाविद्यालयात शिकत-शिकतच भोगावती येथे मधुकर भुईंगडे हेल्थ क्‍लबमध्ये जिमला जात होतो. केवळ सैन्यात भरती व्हायचे म्हणून त्यांचा आटापिटा सुरू होता. सैन्यात भरती होऊन देशसेवा करणार, हा त्यांचा ध्यास होता. म्हणून जिद्दीला पेटून जिममध्ये शरीरयष्टी कमावली. खऱ्या अर्थाने देशसेवा आणि देशाला अर्पण होण्यासाठीच संग्राम घडले होते.
- विक्रम सावेकर, वर्गमित्र व जवान

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soldier sangram patil friend Memories