कारवाईचा अधिकार तुम्हाला दिला कोणी 

युवराज पाटील
Thursday, 17 September 2020

लॉकडाउनमुळे रोजगार नाही, पैसे कोठून आणायचे, कारवाईचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, बेड शिल्लक नाहीत तर कसली कारवाई करता, अशी मास्क न लावणाऱ्यांची कारणे ऐकून केएमटी, वाहतूक शाखेचे पोलिसही अवाक्‌ झाले आहेत

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे रोजगार नाही, पैसे कोठून आणायचे, कारवाईचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, बेड शिल्लक नाहीत तर कसली कारवाई करता, अशी मास्क न लावणाऱ्यांची कारणे ऐकून केएमटी, वाहतूक शाखेचे पोलिसही अवाक्‌ झाले आहेत. शहराच्या विविध भागांत मास्क न लावल्याबद्दल धडक कारवाई सुरू असताना मास्क का लावला नाही, याची कारणेही मजेशीर आहेत. महिला, मुली नियम कटाक्षाने पाळतात. मात्र, तरुणांकडूनच आम्हाला उद्धट उत्तरे ऐकून घ्यावी लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, नियमांचे पालन व्हावे यासाठी महापालिका व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे. प्रमुख चौकांत अथवा वाहनांची ज्या भागात वर्दळ असते, तेथे सकाळी साडेदहाला "केएमटी'चे कर्मचारी जातात. त्यांच्या मदतीला पोलिस आहेत. पूर्वी मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. मास्क न लावलेला वाहनचालक नजरेस पडला, की कर्मचारी गाडी बाजूला घेण्याची विनंती करतात. गाडी अडविली का, म्हणून अरेरावीची भाषा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. रोज किती जणांशी वाद घालत बसायचे म्हणून कर्मचाऱ्यांनी वैतागून रुग्णालयांच्या ठिकाणी ड्यूटी लावून घेतली. सध्या तीन प्रभागांसाठी दोन कर्मचाऱ्यांची मास्कच्या कारवाईसाठी नियुक्ती आहे. 
जे मास्क लावत नाहीत, त्यांची उत्तरे मात्र मजेशीर आहेत. एकतर गाडी अडविल्याचा पहिला राग असतो. दंडाची पावती करा म्हटले, की मग प्रश्‍नांची सरबत्ती सुरू होते. मास्क घरी विसरला इथपासून ते पावती करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? बेड शिल्लक नाहीत तिकडे अधिक लक्ष द्या. एकतर लॉकडाउनमुळे रोजगार नाही, पैसे नाहीत अशी कारणे सांगितली जातात. कर्मचाऱ्यांनी पावतीची सक्ती केल्यावर वशिल्याचे फोन सुरू असतात. अमुक एकाला सांगतो, तमुक एकाशी बोला असाही सल्ला दिला जातो. यातून वादावादी होते. एखादा जास्त वाद घालू लागला तरी गाडीच्या नंबरचा फोटो काढून तो कोविड ग्रुपवर पाठविला जातो. वाहन चालविण्याचा परवाना अथवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा दंड करण्याचा अधिकार केएमटी कर्मचाऱ्यांना नाही. त्यामुळे पोलिसांकडे धुरा सोपविली जाते. 

ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली नियमांचे पालन करतात. मावा, गुटखा खाणाऱ्या तरुणांकडून उद्धट उत्तरे मिळतात. विनंती करूनही ऐकत नाहीत, असे ध्यानात आल्यावर आम्ही गाडीच्या नंबरचा फोटो काढून कोविड ग्रुपवर पाठवितो. मास्क न लावल्यास 100 रुपये, रस्त्यावर थुंकल्यास 200 रुपये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास 500 रुपये दंडाची पावती केली जाते. 
- अभिजित रणनवरे, केएमटी कर्मचारी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Someone gave you the right to take action

टॉपिकस
Topic Tags: