esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

special story on Bike mechanic pooja gadekar kolhapur

चारी बाजूंनी आर्थिक कोंढीत सापडल्याने कुटुंबाची बेचैनी वाढली. घरात सर्वात मोठी असलेल्या पूजाने मात्र याही परिस्थीत न खचता कुटुंबाचा आधार बनण्याचा निश्‍चय केला.

तरीही ती हरली नाही जिद्द ! दुचाकी मॅकेनिक पूजा बनली कुटुंबाचा आधार 

sakal_logo
By
प्रकाश पाटील

कंदलगाव(कोल्हापूर) - संकटाला धैर्याने सामोरे गेल्यास कठीण परिस्थितीवर मात करणे शक्‍य होते. कणेरी माधवनगर येथील बी.ए.च्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या पूजा गाडेकरने असेच धाडस करून गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे वडिलांच्या दुचाकी दुरुस्तीच्या व्यवसायाची धुरा सांभाळून कुटुंबाचा आधार बनली आहे. 

कागल तालुक्‍यातील लिंगनूर पुजाचे मूळ गाव. वडील बाळासाहेब यांचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय यानिमित्त कणेरी परिसरात ते स्थाईक झाले. एमआयडीसी रस्त्यावर बीएसएनएल ऑफिससमोर छोट्याशा टपरीत व्यवसाय करून कुटुंबाची गुजराण करत होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. त्यांना मधुमेहाचा त्रास सुरू होऊन त्याचा परिणाम दृष्टीवर झाला आणि त्यांची दृष्टी अधू झाली. चारी बाजूंनी आर्थिक कोंढीत सापडल्याने कुटुंबाची बेचैनी वाढली. घरात सर्वात मोठी असलेल्या पूजाने मात्र याही परिस्थीत न खचता कुटुंबाचा आधार बनण्याचा निश्‍चय केला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजचे शिक्षण घेतच ती वडिलांनासोबत गॅरेजवर येऊ लागली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर सर्व प्रकारच्या दुचाकी दुरुस्तीत ती पारंगत झाली. 
वडिलांचा अनेकवर्षापूवी अपघाताने एक पाय निकामी झाला होता आणि आता मधुमेहामुळे दृष्टी अधू झाल्याने काम करणे कठीण झाले होते. अशा स्थितीत कुटुंबाचा सर्व भार पूजाने आपल्यावर घेऊन जिद्दीने काम करत आहे. तिचे काम वाहनधारकांच्या पसंतीस आल्याने व्यवसायात जम बसत आहे. कामातून चार पैसे मिळू लागल्याने कुटुंबाचा ती आधार बनली आहे. 

 हे पण वाचा खासगी डॉक्टरांनो नुसत्या नोटाच छापू नका, माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा!

पूजा कामात हुशार आहे. तिच्यासोबत मी गॅरेजवर येतो. तिचा भाऊ लहान असल्याने सध्या तीच आमच्या कुटुंबाचा आधार आहे. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद आहे. 

- बाळासो गाडेकर, वडील 

 वडिलांची दृष्टी अधू झाल्याने घरकामात न गुंतता वडिलांचा व्यवसाय पुढे चालवून त्यातच प्रगती करण्याचा विचार आहे. दुरुस्तीचे काम चांगले होत असल्याने वाहनधारकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र आर्थिक चणचण असल्याने मोडकळीस आलेले गॅरेज दुरुस्त करणे शक्‍य होत नाही.

-पूजा गाडेकर 

 हे पण वाचा - धक्कादायक ; दोन रूग्णालयांच्या निष्काळजीपणात रूग्णाचा गेला प्राण

संपादन - धनाजी सुर्वे 

go to top