होय...! डॉक्‍टर जिंकतील अन् कोरोना हरेल  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

प्रत्येक रुग्णास कोरोनाचे लक्षण एक असले तरी आजारांची, पूर्व इतिहासातील शारीरिक, मानसिक व्याधी विचारात घेऊन उपचाराची दिशा ठरते.

कोल्हापूर - शासकीय रुग्णालय म्हणजे गैरसोयीचे ठिकाण, अशी टीका काही मोजक्‍यांकडून होते. कोरोना काळात मात्र क्वारंटाईन रुग्णांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला की, त्याला सीपीआर अथवा शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. तशी डॉक्‍टरांची धावपळ सुरू होते. 

प्रत्येक रुग्णास कोरोनाचे लक्षण एक असले तरी आजारांची, पूर्व इतिहासातील शारीरिक, मानसिक व्याधी विचारात घेऊन उपचाराची दिशा ठरते. एका रुग्णावर एका वेळी कमीत कमी दोन ते सहा डॉक्‍टर्सचे पथक उपचार करतात. यातून जिल्ह्यात जवळपास ७१६ हून अधिक कोरोनाग्रस्त बरे झाले. यातील ७५ हून अधिक गंभीर अवस्थेतील रुग्णांना सांघिक बळावर डॉक्‍टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

या यशामुळे शासकीय रुग्ण सेवेची समाजातील प्रतिमा उंचावण्यास मदत होईल, असे म्हणायला हवे. ‘डॉक्‍टर्स-डे’च्या निमित्ताने या डॉक्‍टरांच्या कामाचे कौतुक होत आहे. जिल्ह्यात १०० हून अधिक डॉक्‍टरांची फौज तीन महिने दिवस रात्र कष्ट घेत आहे. यात सर्वाधिक रुग्ण सीपीआरमध्ये बरे झाले आहेत. कोरोनावर थेट औषध नाही, पण लक्षणावर उपचार होतात. 
पहिल्यांदा जनरल तपासणी एमबीबीएस डॉक्‍टर करतात. पुढे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला की, हृदय, फुप्फुसाची स्थिती हृदयरोग विभाग तसेच फप्फुस विकार तज्ज्ञांकडून तपासली जाते, तर रुग्णाचे मनोधैर्य वाढविण्याचे काम मानसोपचार तज्ज्ञांकडून केले जाते. काही महिलांना गुंतागुंतीचे आजार असल्यास स्त्री रोग तज्ज्ञांकडून उपचार होतात. विभागप्रमुख तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे रुग्णांच्या आरोग्याचे तपशील जातात, त्यावरून अचुक निदान करीत लक्षणानुसार औषधे देत ७ ते १५ दिवसांत कोरोना बरा केला जातो. 

हे पण वाचा - ब्रेकिंग - कोल्हापूरमधील आयसीयूतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

 

राजर्षी शाहू महाराज शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठता डॉ. आरती घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआर रुग्णालयात उपचार होतात.

एका शिप्टमध्ये ६ ते ८ डॉक्‍टर असतात. एकूण २५ हून अधिक डॉक्‍टर कोरोना उपचार सेवेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story on doctor day