आरोग्य राज्यमंत्री प्रेमींच्या मनात ठसलाय ; ९८८९ नंबर चांगलाच बसलाय

संदीप खांडेकर 
Saturday, 26 September 2020

तालुक्‍यात ९८८९ नंबरच्या गाडीतून त्यांचा दौरा नित्याचा आहे. ग्रामस्थांच्या हृदयात गाडीचा नंबर ठसला गेलाय.

कोल्हापूर : शामराव पाटील-यड्रावकर सहकारातील जाणकार. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे ते वडील. वडिलांची अभ्यासू वृत्ती राजेंद्र पाटील यांच्या रक्तात भिनली. त्यांनी समाजकारणातून राजकारणात उडी घेतली. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक लढवली. जयसिंगपूरच्या पालिकेत ते नगरसेवक झाले. ३२ व्या वर्षी शरद साखर कारखान्याचे ते अध्यक्ष झाले. शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीत दोन वेळा पराभव त्यांच्या वाट्याला आला. मात्र, लढाऊ बाणा त्यांनी सोडला नाही. अखेर पराभवाची हॅट्‌ट्रिक त्यांनी रोखली. अपक्ष उमेदवाराचा त्यांचा करिश्‍मा चालला. आरोग्य राज्यमंत्रिपद ते भूषवत आहेत. तालुक्‍यात ९८८९ नंबरच्या गाडीतून त्यांचा दौरा नित्याचा आहे. ग्रामस्थांच्या हृदयात गाडीचा नंबर ठसला गेलाय.

हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरात राबवलेल्या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक 

शामराव अण्णा शरद सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा. तालुक्‍यात रोजगार निर्मितीचा त्यांचा उद्देश. कारखान्याच्या स्थापनेचे वेड त्यातूनच डोक्‍यात आले. त्यांनी १९९८ मध्ये खरेदी केलेली चारचाकी लकी ठरली. गाडीला वैशिष्ट्यपूर्ण नंबरचा अण्णांचा अट्टहास नव्हता. कारखान्याची मंजुरी ते उभारणीचा टप्पा पूर्ण झाला. अण्णांची गाडीच्या ९८८९ नंबरवर श्रद्धा बसली. घरातल्या नव्या गाड्यांसाठी याच नंबरची फर्माइश झाली. राजेंद्र पाटील यांनी वडिलांचा वारसा चालवला. ते १९९१-९२ मध्ये नगरसेवक झाले.

कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली. पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, पार्वती सहकारी सूतगिरणी, दि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स, पद्मावती यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था, पार्वती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. अधिकारी-कामगार वर्गाशी संपर्कासाठी गाड्या उपयुक्त ठरल्या. या दरम्यान गाडीचा क्रमांकही लोकांच्या ओळखीचा झाला.  

 

हेही वाचा -  साठेबाजी, नैसर्गिक आपत्तीमुळे खाद्य तेलाची दरवाढ 

जनसंपर्कातून राजेंद्र पाटील यांनी कार्याची कक्षा रुंदावली. कमी वयातच त्यांनी राजकारण अनुभवले होते. विधानसभेच्या आखाड्यात तो आजमावण्याचा प्रयत्न झाला. दोन निवडणुकांत यश आले नाही. तिसऱ्या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली. पायाला भिंगरी बांधून मतदारसंघाचा दौरा केला. कामगार वर्गातील फेमस ‘राजू’ मालक गावा-गावांत पोचले. मालकांच्या गाडीपुढे गर्दीचा माहोल रोजचा झाला. या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यांच्या पत्नी स्वरूपा राजकारणात आहेत. जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. विद्यमान नगरसेविका म्हणून त्या कार्यरत आहेत. भाऊ संजय पाटील-यड्रावकर उपनगराध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे सर्वांच्या गाड्यांचा क्रमांक ९८८९ आहे. अण्णांच्या श्रद्धेवर त्यांचा विश्‍वास आहे. मुलगा आदित्य व अजय यांच्या गाड्यांवर हाच नंबर झळकलाय. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the special story of four wheeler rajendra patil yadravkar in kolhapur district