'थुंकीचंद,गो बॅक' हे आपलं कोल्हापूर हाय; हितं थुकलेलं चालत नाय' 

मतिन शेख
Sunday, 13 December 2020

'थुंकीमुक्त चळवळी कडून जनप्रबोधन' ; मध्यवर्ती बस स्थानकावर उपक्रम

कोल्हापुर : सार्वजनिक ठिकाणी थुंकण्या विरोधात कोल्हापुरात 'थुंकीमुक्त चळवळ' उभी राहिली.कोरोना काळात थुंकीमुळे संसर्गाचा अधिक धोका आहे. गेल्या अडीच महिन्या पासून ही चळवळ व्यापक बनत आहे. आज मध्यवर्ती बस स्थानक परिसरात या चळवळीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. 'अॅन्टी स्पीट मूव्हमेंट',रोटरी क्लब तसेच पानपट्टी असोसिएश या उपक्रमात सहभागी झाले होते.

दै.सकाळने या प्रश्नवर प्रकाशझोत टाकल्यानंतर, गेले अडीच महिने थुंकीबहाद्दरांना चाप लावण्यासाठी  नागरिक व सामाजिक संघटनांनी यांनी सोशल मीडिया, तसेच रस्त्यावर उतरून प्रबोधन करत आहेत.

कोल्हापुरात सुरु झालेल्या या चळवळीचा आदर्श घेत राज्यभरात चळवळ पोहचली आहे.या चळवळीचे पुढचे पाऊल म्हणुन आज सकाळी 'अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूर' च्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जनजागृती मोहीम राबवली.'थुंकी मुक्त कोल्हापूर,निरोगी कोल्हापूर,
'थुंकीचंद,गो बॅक','हे आपलं कोल्हापूर हाय;हितं थुकलेलं चालत नाय' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

हेही वाचा- क्रिकेटचं बदलतं स्वरूप: ‘कोंबडी’ उडाली भुर्रऽऽऽऽ ‘चिअर गर्ल्स’ आल्या...! -

याप्रसंगी 'रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी' कडून जनजागृती पर बॅनर्स, स्टिकर्सचे वितरण करण्यात आले. तसेच परिसरातील दुकानामध्ये, स्थानकातील बसेस वर थुंकी विरोधी संदेशाचे स्टिकर्स लावण्यात आले. यावेळी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ कृती समितीच्या कार्यकर्त्यांसह,नगरसेवक आशिष ढवळे, पानपट्टी संघटनेचे अरुण सावंत, फेरीवाले संघटनेचे कॉम्रेड दिलीप पवार, खाजगी बस प्रवासी संघटनेचे सतीशचंद्र कांबळे, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चे अध्यक्ष एस. एन. जांभळे, परिवहन अधिकारी प्रदीप शिंगारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचे संयोजन दीपा शिपुरकर,राहुल राजशेखर,अभिजीत गुरव,सुनीता मेंगाणे, महेश ढवळे,विजय धर्माधिकारी,गीता हसुरकर,सारिका बकरे,सागर बकरे,भानुदास डोईफोडे,मिलिंद चिटणीस,विद्याधर सोहोनी, हिमानी सोहोनी,शैलेंद्र मोहिते,अश्विनी शिपेकर माने,बंडा पेडणेकर,आनंद आगळगावकर यांनी केले.

 

प्रशासनाने कडक कारवाई करावी

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायद्याने गुन्हा परंतु लोकांकडून सतत ही कृती केली जाते. तरी थुंकी बहाद्दरांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणीही नागरिक, सामाजिक संस्था कडून केली जात आहे.जिल्हाधिकारी तसेच पोलिस आयुक्तांना यासंबंधीचे निवेदन चळवळी कडून देण्यात येणार आहे. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spit free movement Awareness campaign in Kolhapur Central Bus Stand area