स्वयंस्फूर्तीने झाडाखाली विसावा... 

सुधाकर काशिद
गुरुवार, 9 एप्रिल 2020

पोलिस आले की, पळून जायचे...! पोलिस गेले की, पुन्हा एकत्र यायचे.., असे संचारबंदीच्या काळातले कोल्हापुरातले चित्र आहे; पण ग्रामीण भागात मात्र भीतीपोटी म्हणा किंवा स्वयंस्फूर्तीने संचारबंदीचा अंमल चालू आहे. कारिवडे (ता. राधानगरी) येथे मुंबईहून आलेले एक पूर्ण कुटुंब गावाबाहेर एका लहान शेडमध्ये व आंब्याच्या झाडाखाली गेले आठ दिवस बसून आहे. त्यात पायावर शस्त्रक्रिया झालेली एक महिला आहे; पण संसर्ग टाळण्यासाठी आहे ती परिस्थिती मान्य करून हे कुटुंब 14 दिवस पूर्ण होण्याची वाट पाहात आहेत. 

कोल्हापूर : पोलिस आले की, पळून जायचे...! पोलिस गेले की, पुन्हा एकत्र यायचे.., असे संचारबंदीच्या काळातले कोल्हापुरातले चित्र आहे; पण ग्रामीण भागात मात्र भीतीपोटी म्हणा किंवा स्वयंस्फूर्तीने संचारबंदीचा अंमल चालू आहे. कारिवडे (ता. राधानगरी) येथे मुंबईहून आलेले एक पूर्ण कुटुंब गावाबाहेर एका लहान शेडमध्ये व आंब्याच्या झाडाखाली गेले आठ दिवस बसून आहे. त्यात पायावर शस्त्रक्रिया झालेली एक महिला आहे; पण संसर्ग टाळण्यासाठी आहे ती परिस्थिती मान्य करून हे कुटुंब 14 दिवस पूर्ण होण्याची वाट पाहात आहेत. 

मूळचे कारिवडे; पण मुंबईत असलेल्या एका महिलेच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. ती रुग्णवाहिकेतून गावापर्यंत आली. शस्त्रक्रिया, "कोरोना' चाचणी अशी सर्व कागदपत्रे तिच्याकडे आहेत. तिच्या सोबत तिची दोन मुले, सुना आहेत. थेट गावातील घरात राहायला आलो तर आजूबाजूच्या लोकात शंकाकुशंका व्यक्त होऊ नये किंवा निष्कारण गैरसमज निर्माण होऊ नये, म्हणून हे कुटुंब स्वत:हून गावाबाहेर थांबले आहे. येथेच त्यांनी स्वयंपाकाचे तात्पुरते साहित्य आणले आहे.

हे कुटुंब पाणी आणण्यासाठीही गावात जात नाही. त्यांनी काही अंतरावर पाण्यासाठी भांडी ठेवली आहेत. त्यात त्यांचे परिचित पाणी आणून देतात. जेथे त्यांचे राहण्याचे शेड आहे, त्याच्या लगतच आंब्याची गर्द झाडी आहे. त्या झाडाच्या सावलीत सर्वजण दिवसभर बसून असतात. "कोरोना'च्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या क्वारंटाईनच्या परिस्थितीस सामोरे जावेच लागणार हे मान्य करतात. राधानगरी जलाशयाच्या जवळ हे ठिकाण आहे. रस्त्यावर वाहतूक नाही. त्यामुळे एक निरव शांतता या परिसरात आहे. 

एकीकडे ग्रामीण भागात ही परिस्थिती असताना शहरी भागात मात्र अजूनही सवडीप्रमाणे संचारबंदी आहे. तरुण घोळक्‍या घोळक्‍याने बसलेले असतात. रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगलेले असतात. छोट्या कारणांसाठी लोक घराबाहेर पडतात; पण ग्रामीण भागात संचारबंदीबद्दल जागरूकता आहे. कारीवडे गावाबाहेर आठ दिवस एका शेडमध्ये व झाडाच्या सावलीत बसून राहिलेले एक कुटुंब हे त्याचे उदाहरण आहे. 
 

संसर्गाची भीती सर्वांना आहे. आम्ही मुंबईहून आलो म्हटल्यावर त्या नजरेने बघणार यात चूक नाही. त्यामुळे आम्ही गावाबाहेर रात्री छोट्या शेडमध्ये आणि दिवसभर झाडाच्या सावलीत चौदा दिवस बसून राहण्याचा निर्णय घेतला आहे. 
- मुंबईहून आलेले ग्रामस्थ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spontaneously rest under the tree ...