बारावीच्या 'एवढ्या' विद्यार्थ्यांनी मिळविला खेळातून 'बोनस'

गणेश बुरुड
Saturday, 18 July 2020

विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन म्हणून दहावी व बारावी परीक्षेत बोनस गुण देण्यात येतात. यात जिल्हा विभाग व राज्य स्पर्धेतील विजेते, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार गुण मिळतात.

महागाव : राज्य सरकारने विविध खेळांच्या जिल्हा विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परीक्षेत बोनस गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागातील तब्ब्ल 2074 विद्यार्थ्यांना लाभ झाला. त्यांच्या पात्रतेनुसार बोनस गुण देण्यात आले आहेत. 

दरम्यान, परीक्षेत कॉपी व अन्य गैरप्रकाराबद्दल 40 विद्यार्थ्यांची फेब्रु-मार्च 2020 परीक्षेतील त्यांनी केलेल्या गैरमार्गाच्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर परीक्षा मंडळाचे विभागीय सचिव एस. एम. आवारी यांनी दिली. 

विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन म्हणून दहावी व बारावी परीक्षेत बोनस गुण देण्यात येतात. यात जिल्हा विभाग व राज्य स्पर्धेतील विजेते, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार गुण मिळतात. त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी मंडळाला प्रस्ताव पाठवतात. त्यांची छाननी करून मंडळाकडून पात्र विद्यार्थ्यांना बोनस गुण देण्यात येतात. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 2074 प्रस्ताव आले होते. त्यातील सर्व पात्र ठरले असून, सर्वांना बोनस गुण दिले आहेत. 

परीक्षा केंद्रावर कॉपीप्रकरणी 35 विद्यार्थ्यांना पकडण्यात आले होते. यात कोल्हापूर-26, सांगली-02, सातारा-06 अशा विद्यार्थ्यांचा गैरप्रकारांत सहभाग होता. तसेच एक विद्यार्थ्यांची चौकशीअंती दोषी आढळल्याने त्या एक विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. तसेच पुढील पाच परीक्षेसाठी प्रतिबंध घातला आहे. 

बोनस गुणाचे निकष 
- जिल्हा स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक : 5 गुण 
- विभाग स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक : 10 गुण 
- विभाग स्पर्धेतील पहिल्या तीन संघांतील खेळाडूंना प्रत्येकी : 5 गुण 
- राज्य स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक : 15 गुण 
- जिल्हा स्पर्धेतून थेट राज्य स्पर्धेत सहभाग : 10 गुण 
- विभाग स्पर्धेतून थेट राज्य स्पर्धेत सहभाग : 15 गुण

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports 'Bonus' Earn By 2074 Students Kolhapur Marathi News