...अन् डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच केले क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

नेहरू रोडवरील हॉस्पिटलही सील केले असून, डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन केले आहे.

जयसिंगपूर (कोल्हापूर) - शहरातील दहाव्या गल्लीतील वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्‍टरसह नऊ जणांचे आज स्वॅब घेतले. नेहरू रोडवरील हॉस्पिटलही सील केले असून, डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन केले आहे.

दहाव्या गल्लीतील वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालिका प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उपाययोजना केल्या आहेत. संबंधित वृद्धावर प्राथमिक उपचार केलेल्या डॉक्‍टरसह कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले होते. वृद्धाच्या कुटुंबीयांचे गुरुवारी स्वॅब घेतल्यानंतर आज डॉक्‍टरसह नऊ जणांचे स्वॅब घेतले.

नेहरू रोडवरील एक हॉस्पिटलही सुरक्षिततेच्या कारणावरून सील केल्याने रुग्णांमधूनही घबराट निर्माण झाली होती. नातेवाइकांनी डिस्चार्जची मागणी केल्यानंतर रुग्णांना तातडीने डिस्चार्ज दिला. डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना गुरुवारपासून हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन केले असून, हॉस्पिटलही प्रशासनाने सील केले आहे. 

हे पण वाचा -  कोल्हापूर ; चंदगड तालुका हादरला ; त्या डॉक्‍टरच्या संपर्कात तब्बल दोनशे रुग्ण

प्रशासनाच्यावतीने संस्थात्मक विलगीकरणासाठी नगरपालिका शाळांसह शहरातील मंगल कार्यालयेदेखील तयार ठेवली आहेत. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून, स्वॅब रिपोर्टवरच शहरातील लॉकडाउनचे चित्र अवलंबून असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Staff including doctors were quarantined at hospital in kolhapur