सोशल डिस्टन्स, मास्क वापरासह, सलून दुकाने झाली सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

शासनाचे सर्व नियम पाळून आज जिल्ह्यातील सलून दुकाने सुरू झाल्याने व्यावसायिकांचा जीव भांड्यात पडला.

कोल्हापूर : शासनाचे सर्व नियम पाळून आज जिल्ह्यातील सलून दुकाने सुरू झाल्याने व्यावसायिकांचा जीव भांड्यात पडला. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्कचा वापर करून शासनाने केस कापण्यास परवानगी दिली आहे, दाढी करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्याचे जिल्ह्यातील सलून व्यावसायिकांनी पालन करत आज व्यवसाय सुरू केला. 

लॉकडाउनच्या काळात सलून तसेच ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहिली. याच महिन्यात दुकाने सुरू झाली पण अनलॉक वन सुरू झाल्यानंतर दुकाने पुन्हा बंद झाली. सोशल डिस्टंन्स राखता येत नसल्याच्या कारणावरून शासनाने बंदी केली. 

नाभिक बांधवांनी आंदोलन करून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. शनिवारपासून शासनाने फक्त केस कापण्यास परवानगी दिली. लॉकडाउनच्या काळात सलून व्यावसायिकांना मोठा फटका बसला. बहुतांशी व्यावसायिक हातावरचे पोट असणारे आहेत. कोरोनाच्या काळात शासनाला साथ देण्यासाठी दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली. संचारबंदीत जशी शिथिलता आली, तसे अन्य उद्योग व्यावसायिकांना मुभा दिली गेली. सलून व्यावसायिकांना सॅनिटायझर, मास्क, एकावेळी एकाच ग्राहकाला परवानगी, असे नियम घालून परवानगी दिली गेली. याच दरम्यान सलून व्यावसायिकांनी दरात वाढ केली. तीस जूनपर्यंत लॉकडाउन वाढल्याची घोषणा झाली. त्यावेळी सलून दुकानांना बंदी घालण्यात आली. "अन्य उद्योग व्यावसायिकांना परवानगी देता मग आम्हाला का नाही.' असे सांगत ते रस्त्यावर उतरले. दसरा चौकातून मोर्चाही काढला. 

शासनाने काल परवानगी दिल्यानंतर सकाळी सातपासून सलून दुकानात लगबग सुरू झाली. ज्यांचे केस वाढले आहेत अशांनी गर्दी केली. मात्र व्यावसायिकांनी एकाच ग्राहकाला प्रवेश देऊन सोशल डिस्टंन्स राखण्याचा प्रयत्न केला. दाढी राहू दे किमान केस कापण्यास तरी परवानगी मिळाली या हेतूने व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर दुकाने आजपासून सुरू झाली. 

चक्क सोन्याच्या कात्रीने केस कापले 
राजारामपुरीतील एका दुकानात चक्क सोन्याच्या कात्रीचा केस कापण्यासाठी वापर झाला. रामभाऊ संकपाळ यांनी कात्रीचा वापर केला. कोल्हापुरात वेगळे काहीतरी करून दाखविण्याचा नेहमी प्रयत्न होतो. त्यातूनच अनोखा प्रयोग झाला. दुकाने सुरू झाल्याचा आजचा दिवस आपल्यासाठी सोन्याचा दिवस असल्याने पहिल्यांदा आलेल्या ग्राहकांसाठी कात्रीचा वापर झाल्याचे संकपाळ यांनी सांगितले. दरम्यान, नऊ इंच लांबीची ही कात्री असून श्री. संकपाळ यांनी ती गेल्या वर्षी तयार करून घेतली आहे. 

एक खुर्ची सोडून तिसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर ग्राहकाला बसवून केस कटिंग केले जाते. ग्राहकांची नोंद करूनच दुकानात प्रवेश दिला जातो. खुर्ची सॅनिटायझर करून घेतली जाते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दुकाने सुरू झाली. 
- रेणुराज चव्हाण, सलून व्यावसायिक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: started in salon shops