धरमाबाई ठरल्या भव्य कलाकृतीच्या साक्षीदार; अन् असा उभारला ताराराणींचा पुतळा!

संभाजी गंडमाळे
Wednesday, 13 January 2021

देदीप्यमान इतिहासाचा अभिमान आणि तो बाळगतानाच सर्वोत्कृष्टतेचा ध्यास, हा कोल्हापुरी माणसांचा स्वभावच.

कोल्हापूर : महापालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त सभागृहाने बोधचिन्हाबरोबरच आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे शहरात प्रवेश करताना करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांचा भव्य पुतळा उभारण्याचा. प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांनी ही अद्वितीय कलाकृती साकारली. दोन पायांवर तोल सांभाळणाऱ्या घोड्यासह २१ फूट उंचीच्या या कलाकृतीच्या निर्मितीमागील कथाही तितकीच रंजक आहे.
 

देदीप्यमान इतिहासाचा अभिमान आणि तो बाळगतानाच सर्वोत्कृष्टतेचा ध्यास, हा कोल्हापुरी माणसांचा स्वभावच. त्यातही इथली कलाकार मंडळी म्हणजे जगात भारी. महापालिकेने ताराराणींचा भव्य पुतळा उभारण्याची जबाबदारी शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांच्याकडे दिली. मुळात जगात फारच थोडे चित्रकार कुशल शिल्पकार झाले, असा इतिहास आहे आणि या नामावलीत त्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. जिवंत घोडा जर दोन पायांवर उभा राहत असेल तर ताराराणींच्या पुतळ्यातील घोडाही दोन पायांवर उभा राहिला पाहिजे, हा विचार घेऊनच त्यांनी कामाला प्रारंभ केला. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला. पुतळ्यासाठी मॉडेल म्हणून कोण, हा प्रश्‍न येताच तत्कालीन काही अभिनेत्रींचीही नावे पुढे आली; पण कुणाचेच नाव नक्की होत नव्हते. कारण रवींद्र मेस्त्री यांना या पुतळ्यासाठी एका क्षणात ताराराणींची आठवण व्हावी, असेच मॉडेल हवे होते.

मात्र, ते काही मिळत नव्हते. शिवाजी उद्यमनगरात ते काही कामानिमित्त आल्यानंतर तेथे त्यांना स्क्रॅप गोळा करण्यासाठी आलेल्या धरमाबाई शिंदे दिसल्या. ताराराणींचा पुतळा म्हटल्यावर धरमाबाईंनीही क्षणार्धात संमती दिली आणि पुढे एक भव्यदिव्य कलाकृती आकाराला आली. धरमाबाई राहायला यादवनगरात; पण यानिमित्ताने त्या एका भव्य कलाकृतीच्या साक्षीदार ठरल्या आणि हा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर आयुष्याच्या अखेरपर्यंत झळकत राहिला. 

हेही वाचा- Inspiring: रसायनशास्त्रातील प्रयोगांची प्रक्रिया सुलभ; प्लॅटिनमला दिला पर्याय -

चार वर्षांपूर्वी सुशोभीकरण...
ताराराणींच्या या अश्‍वारूढ पुतळ्याची उंची तलवारीच्या टोकापासून घोड्याच्या पायापर्यंत २१ फूट आहे. (कै.) द. न. कणेरकर यांच्या महापौरपदाच्या काळात या पुतळ्याची उभारणी झाली. १७ फेब्रुवारी १९८१ रोजी पुतळ्याचे अनावरण झाले. चारच वर्षांपूर्वी हा पुतळा आणि परिसराचे नव्याने सुशोभीकरण झाले आहे. 

रवींद्र मेस्त्री यांनी ताराराणींचा पुतळा करण्यापूर्वी सर्वांगीण अभ्यास केला होता. अनेक पुस्तके त्यांनी वाचून काढली. पुतळ्यासाठी ते सतत स्केचिस करत बसत. पुतळ्याचे छोटे मॉडेलही त्यांनी केले होते; मात्र प्रत्यक्षात पुतळ्याची उंची अधिक असल्याने तो बाहेरच तयार झाला. त्यामुळे तो पूर्ण झाल्यानंतरच आम्हाला बघायला मिळाला होता.  
- विजयमाला मेस्त्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statue of Tararani information by sambhaji gandmale