वीज बिल माफीसाठी इचलकरंजीत "या' संघटना आक्रमक, केली जोरदार निदर्शने आणि बिलांची होळी

ऋषीकेश राऊत
Friday, 11 September 2020

लॉकडाउनमधील घरगुती वीज बिल माफीसाठी गुरुवारी पुन्हा महावितरण कार्यालयासमोर आंदोलने झाली

इचलकरंजी : लॉकडाउनमधील घरगुती वीज बिल माफीसाठी गुरुवारी पुन्हा महावितरण कार्यालयासमोर आंदोलने झाली. अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व आम आदमी पार्टीच्यावतीने वीज बिल माफीसाठी निदर्शने केली. महावितरण कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्तात या संघटनांच्या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळ स्वीकारले. 

जनवादी महिला संघटना 
महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. लॉकडाउनमधील घरगुती वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी महिलांनी निदर्शने केली. उपस्थित महिलांनी वीज बिलांची होळी केली. मागणीचे निवेदन महावितरण कार्यालयात दिले. कोरोनामुळे लॉकडाउन पुकारला. अशा गंभीर परिस्थितीतही शासन जनतेविरोधी निर्णय घेत आहे. त्यामुळे घरगुती वीज बिलाचे दर माफ करावेत, अशी मागणी संघटनेच्यावतीने केली. मुमताज हैदर, जरीना सुतार, अनिता वड्ड, लक्ष्मी शिंदे, सुनीता कोळी, अर्चना कोळी, विजया पाटील, चंद्रकला मगदूम, शानाबाई कुंभार उपस्थित होत्या. 

आम आदमी पार्टी 
कोरोनातील चार महिन्यांचे 200 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याचे आश्‍वासन शासनाने पूर्ण करावे, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून उपस्थितांना शांत केले. वीज बिल माफीसह वीज दरवाढ मागे घेऊन 30 टक्के विजेचे दर कपात करण्याचा निर्णय न घेतल्यास आम आदमी पार्टीच्यावतीने महावितरण कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा दिला. मागणीचे निवेदन महावितरणला दिले. आंदोलनात प्रकाश सुतार, जावेद मुल्ला, प्रमोद परीट, वसंत कोरवी, मदन मुथा, रावसो पाटील, यशवंत भंडारे, उदय गणमुखी सहभागी होते. 
 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strong Protests In Ichalkaranji For Electricity Bill Waiver Kolhapur Marathi News