महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या बँकेचा आरबीआयकडून परवाना रद्द, ठेवीदारांमध्ये अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 December 2020

एकूणच ठेवीदारांच्या हितविरोधी कामाचा ठपका ठेवत हा परवाना रद्द केला असून, यापुढे या बॅंकेतून बॅंकिंग व्यवहार होणार नाहीत

कोल्हापूर : येथील दि सुभद्रा लोकल एरिया बॅंकेचा परवाना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ‘आरबीआय’ने रद्द केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात अपेक्षित नक्त मूल्य (नेटवर्थ) न ठेवणे, ठेवीच्या तुलनेत कर्जाचे कमी वाटप आणि एकूणच ठेवीदारांच्या हितविरोधी कामाचा ठपका ठेवत हा परवाना रद्द केला असून, यापुढे या बॅंकेतून बॅंकिंग व्यवहार होणार नाहीत, असेही रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केले आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या नियमन कायदा १९४९ च्या कलम २२ (४) अन्वये 
हा परवाना रद्द केला आहे. २०१९-२०२० च्या आर्थिक वर्षात बॅंकेने दोन तिमाहींसाठी किमान निव्वळ नियमाचा (मिनिमम नेटवर्थ) भंग केला आहे. मात्र, बॅंकेकडे मुबलक पैसा असून ठेवीदारांनी हवालदिल होऊ नये, ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळतील, असेही रिझर्व्ह बॅंकेचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. 

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी येथील यूथ को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणले होते. त्यानंतर अशा पद्धतीची कारवाई झालेली सुभद्रा लोकल एरिया बॅंक ही दुसरी बॅंक आहे.

हेही वाचा - हायटेक प्रचारात अंधश्रद्धेचा व्हायरस नकोच -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: subhadra local bank license taken from RBI in kolhapur