कोल्हापुरात आयटी पार्क उभारु : सुभाष देसाई

subhash desai in kolhapur tour and declare IT park start in kolhapur
subhash desai in kolhapur tour and declare IT park start in kolhapur

म्हाकवे (कोल्हापूर) : मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात आयटी पार्क उभारू, अशी घोषणा आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. कोल्हापुरातील उद्योगधंद्यामध्ये मोठ्या गुंतवणुकीसाठीही आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केनवडे (ता. कागल) येथील अन्नपुर्णा शुगर अँण्ड जॅगरी वर्क्‍सच्या पहिल्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पी. एन. पाटील अध्यक्षस्थानी होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, सुरेश हाळवणकर, प्रकाश अबिटकर, श्रीपतराव शिंदे, बजरंग देसाई, ए. वाय. पाटील- म्हाकवेकर, काकासाहेब सावडकर, आनंदा तळेकर, धनराज घाटगे, के. बी. वाडकर, एम. टी. पोवार, सुरेश मर्दाने उपस्थित होते. 

देसाई म्हणाले, 'या पूर्वीचे फडणवीस सरकारमध्ये गुंतवणूकीचे करारच होत होते. फडणवीस सरकार उत्सव करणारे होते; परंतू कार्यवाही काहीच नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे राज्यात उद्योगधंद्यासाठी एक लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. राज्यातील प्रत्येक तरूणाला रोजगार मिळाला पाहिजे, असा आमचा अजेंडा आहे.' 

पुढे ते म्हणाले, 'राजकारणात अपयश आले म्हणून खचून न जाता संजय घाटगे सामान्यांसाठी कार्यरत राहिले. माणसांच्या मनामध्ये कायम राहतो तोच खरा नेता असतो, याची प्रचिती त्यांच्या कार्यातून येते. शिवसेनेमध्ये गुणांची कदर होते. जगभरात साखरेची जागा गुळ घेत आहे. गुळाला जगभरातून मागणी वाढेल, याचा अंदाज घेवूनच घाटगे यांनी जॅगरी प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प इतका चांगला चालेल की पुढील एखाद्या गळीत हंगामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, असा मला विश्‍वास आहे.'

यावेळी  मुश्रीफ म्हणाले, 'या प्रकल्पाला यश मिळावे. तो लवकर कर्जमुक्त व्हावा. प्रकल्पाच्या जागी मुख्य साखर कारखाना तयार व्हावा. कागल तालुक्‍यात पाच साखर कारखाने आहेत. त्यापैकी बिद्री कारखाना वगळता सर्वच कारखाने उभारणीत माझे योगदान आहे. कोणताही गट, तट न पाहता तालुक्‍यातील प्रकल्पांना मी सहकार्य केले.'

यावेळी गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी स्वागत केले. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार पी. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अन्नपुर्णाच्या उभारणीत मोलाचे सहकार्याबद्दल आकाराम बचाटे यांचा तसेच अन्य मान्यवरांचा उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते सत्कार झाला. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील, नितीन पाटील, विष्णूअण्णा गायकवाड उपस्थित होते. दत्तोपंत वालावलकर यांनी आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com