कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसची अचानक तपासणी; उद्योजकांत उडाली खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

इचलकरंजीत ‘प्रदूषण नियंत्रण’ पथकाची कारवाई

इचलकरंजी (कोलहापूर)  : पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून इचलकरंजीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या सर्व प्रोसेसची अचानकपणे तपासणी करण्यात आली आहे. यावेळी कोल्हापूरसह सांगली व रत्नागिरीतील अधिकारी या तपासणी मोहिमेत सहभागी झाले होते.  रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेमुळे प्रोसेस उद्योजकांत खळबळ उडाली आहे.

पंचगंगा नदीप्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेरवाड बंधारा येथे केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर इचलकरंजीतील प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या उद्योगातील घटकांची चर्चा सुरू झाली. आज सायंकाळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इचलकरंजीतील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेस उद्योगांची अचानकपणे तपासणी सुरू केली. या मोहिमेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ९ जणांचा समावेश होता. यामध्ये कोल्हापूरसह सांगली व रत्नागिरीतील अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले आहेत.

हेही वाचा- काँग्रेसला यश येणार ? कोल्हापुरातील मोठ्या नेत्याला परत आणण्याची जबाबदारी आमदार पी. एन. पाटलांवर -

या अधिकाऱ्यांनी एकूण तीन पथके बनवून शहरातील विविध प्रोसेसची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये जे प्रोसेस उद्योग प्रदूषित पाण्यावरील प्रक्रियेसंबंधी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या तपासणीमुळे प्रोसेस उद्योजकांत खळबळ उडाली आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudden inspection of all textile processing processes ichalkaranji