
कोल्हापूर : डोक्यावर आभाळ... गारठ्याची उठलेली लहर... उसाच्या पालात थाटलेला संसार.. दिवसभर कोयता घेऊन थकलेल्या हातांना काहीतरी गोड करण्याची आस... अशी धांदल झोपडीसमोर चाललेली. हे चित्र आहे कसबा बावड्यातील राजाराम कारखान्याच्या गाडी अड्ड्यातील. दिवाळी हा आनंदाचा अन् रुचकर फराळाच्या सोबतीने साजरा होणारा सण; पण या कष्टकऱ्यांच्या वाट्याला मात्र दिवाळीचा आनंद आलेला नाही. उसाच्या फडातच त्यांची दिवाळी साजरी होत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी पोरांचे शिक्षण, मुलींचे लग्न, संसाराचा गाडा हाकण्यासाठी मराठवाड्यातून अनेक कुटुंबे जिल्ह्यात दाखल झाली आहेत. साखर कारखाने दिवाळीच्या आधीच सुरू झाल्यामुळे तोडणी कामगारांची दिवाळी यंदा उसाच्या फडातच होत आहे. काल लक्ष्मीपूजनाचा दिवस. फळे, झेंडूची फुले, फराळाचे सजवलेले ताट अशी लगबग घरांतघरांत; परंतु ऊसतोड मजुरांच्या पालावर मात्र दिवाळीचा गंध नाही. भल्या पहाटेच फडात घामाच्या धारातच अभ्यंग स्नान झालं. दिवसभर उसाच्या फडावर राबून आलेले जीव पाचटाच्या झोपडीत विसावत आहेत.
सणाला काही गोडाचं व्हावं म्हणून काही कुटुंबांनी पुरणपोळीचा बेत आखला आहे. राहुट्याच्या पुढे तीन दगडाच्या चुलीवर पुरणाच्या पोळ्या उलथत आहेत. दिवसभर उसावर चाललेला हात आता पोळीचे चटके सहन करीत संसारातील गोडवा वाढवत आहे. कोरोनामुळे अनेकांनी मुलं गावकडेच सोडून कारखाने गाठले आहेत. या दिवाळीत मुलं जवळ नसल्याने या पोळ्यांचा घासही त्यांना गोड लागेना. ओढ मुलांकडे असली तरी कर्तव्य आड येत आहे.
कर्जफेडीसाठी दिवाळीचा विसर
मुकादमाकडून उचल घेऊन घेतलेल्या बैलजोड्या तसेच कर्जफेडीसाठी ऊस तोडणी कामगारांनी सणसूद विसरून साखर कारखाना परिसरात मुक्काम ठोकला आहे. कोरोनाने हाल केले. कोरोनाला सोबत घेऊन ऊसतोड केली, तरच उचलीची परतफेड होणार आहे.
"सणसूद आमच्या नशिबी नाही. राबणं हाच आमचा सण झालाय. आम्हाला पण वाटतं सर्वांसारखं दिवाळी आनंदात साजरी करावी. फराळ, कपडे घ्यावेत; पण घेतलेले कर्ज फेडायचे आहे. त्यामुळे थोडी मुरड घालावी लागते."
- शांतिलाल पाखरे, ऊसतोड कामगार
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.