रस्त्यावर निर्जन ठिकाणी तरूणीचा विनयभंग ; पीडितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयितानेही विष घेतले आहे; त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आपटी (ता. पन्हाळा) - विनयभंग झाल्यानंतर नैराश्‍यातून एका तरुणीने विष घेऊन आत्महत्या केली. पन्हाळा तालुक्‍यातील नणुंद्रे येथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयितानेही विष घेतले आहे; त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मृत तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे. पन्हाळा पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या अक्षय गणपती चव्हाण (वय २३) व प्रदीप कृष्णात पाटील (वय २०, रा. दोघे नणुंद्रे) या दोघांना पन्हाळा न्यायालयाने सोमवार (ता. २)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी नणुंद्रे गावाला भेट देऊन पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व संबंधितांवर कडक कारवाईचे आश्‍वासन दिले.

या प्रकरणाबाबत पन्हाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनयभंगाचा प्रकार २३ ऑक्‍टोबर रोजी घडला आहे. संबंधित युवती त्या दिवशी दुपारी काही कामानिमित्त कोलोलीकडे निघाली होती. नणुंद्रेतील अजित तानाजी पाटील, अक्षय गणपती चव्हाण व प्रदीप कृष्णात पाटील या तरुणांनी गाडीवरून तिचा पाठलाग केला. कोतोली-कोलोली रस्त्यावर निर्जन ठिकाणी तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने संबंधित तरुणी घाबरली. ती तातडीने घरी आली. नैराश्‍य आणि बदनामीच्या भीतीने तिने घरात तणनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तातडीने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे सात दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज दुपारी तिचा मृत्यू झाला.

हे पण वाचा खासगी भिशीसाठी धोक्‍याची घंटा, भिशी प्रमुख पळून जाण्याचे प्रकार

पोलिसांनी सांगितले, की पीडित मुलीच्या आईने गुरुवारी (ता. २९) रात्री यासंदर्भात पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच रात्री संशयित अक्षय गणपती चव्हाण व प्रदीप कृष्णात पाटील यांना अटक केली. प्रमुख संशयित अजित तानाजी पाटील याला अटक करण्यासाठी पोलिस त्याच्या घरी गेले होते; तेव्हा विष प्यायल्यामुळे त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. पन्हाळा पोलिस निरीक्षक फडतरे तपास करीत आहेत.

हे पण वाचायंदा आय लिग युवा फुटबॉल रद्द

संशयिताच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न
दरम्यान, संबंधित तरुणीवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी संतप्त नातेवाइकांकडून या प्रकरणातील मुख्य संशयित अजित तानाजी पाटील याच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पन्हाळा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide Molestation of a young woman in kolhapur