पदवीधर-शिक्षक निवडणुकीनंतर राज्यातील सत्तासमीकरण बदलेल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे मुख्य उपस्थित होते

कागल (कोल्हापूर) - बिहार व इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळविले. तीच परंपरा महाराष्ट्रातही राहील. या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तासमीकरणे बदलतील, असा विश्‍वास भाजपचे कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक खासदार सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्रामसिंह देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मेळावा झाला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे मुख्य उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘पक्षासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणाचे संदर्भ बदलणार आहेत. त्याची सुरवात कोल्हापूरमधून मताधिक्‍याने करावी. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावे.’’

श्री. घाटगे म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणीपासून भाजपने आघाडी घेतली आहे. ती पुढेही कायम राहील. हक्काचे असलेले मतदान करून घेऊन कोल्हापूरमधून जास्तीत जास्त मताधिक्‍य देऊन देशमुख यांच्या विजयात आपला मोलाचा वाटा कोल्हापूरकर उचलतील.’’ अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक यशवंत ऊर्फ बॉबी माने यांनी आभार केले. एम. पी. पाटील, संचालक मारुती निगवे, भुपाल पाटील, मारुती पाटील, सचिन मगदूम, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे पण वाचा पैलवान ते मगरींचा वस्ताद ; महाराष्ट्राचा क्रॉकोडाईल मॅन रामदास

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sujay vikhe patil speech in kolhapur